Mumbai water supply News : लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत तसेच ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो. मुंबईला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ७ धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. यामुळे मुंबईत पाणी कपात लागू केली जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील सात तलावात केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून मे व जून महिन्यात मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
एकीकडे उष्णतेच्या लाटेमुळेव वाढत्या उष्म्यामुळे मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. यामुळे पाणीकपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मुंबई महापालिका प्रशासनाकडून अद्याप पाणी कपातीचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. मात्र मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन वारंवार केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मुंबई शहराला व उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईत पाणीटंचाईची भीती व्यक्त होत आहे. मात्र,महापालिकेकडूनअद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, भातसा, तानसा, तुळशी आणि विहार या ७ धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. यातील अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा हे तलाव आटले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईतला पाणीपुरवठा अपुरा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून कोणत्याही क्षणी पाणीकपातीचा निर्णय महापालिका घेऊ शकते.
अप्पर वैतरणा(१८.५६ टक्के), मध्य वैतरणा(९.६६),मोडक सागर(२४.२७), तानसा (३५.८७ टक्के,भातसा (१८ टक्के),विहार (३२.६६) व तुळशी (३७. ६७ टक्के).
मराठवाडा, मुंबई, रायगड, ठाण्यासह कोकण गोव्यात आज उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आल आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. आज सांगली व सोलापूर नांदेड लातूर व धाराशिव येथे काही ठिकाणी आज रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे बाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी राज्यात मालेगाव सर्वाधिक हॉट ठरले येथे ४४ डिग्री सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानांची उच्चांकी नोंद झाली.
संबंधित बातम्या