मुंबईत सांताक्रूझ भागातील एसव्ही रोडवर असलेलं ३०० वर्ष जुनं गोरखचिंचेचं झाड (Baobab tree) एमएमआरडीए प्रशासनाने तोडलं आहे. पोर्तुगीज आणि त्यानंतर आलेले ब्रिटीश यांच्या राजवटीच्या काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळात तब्बल ३०० वर्षांहून अधिक काळ हे झाड येथे उभे होते. इतके जुने गोरखचिंचेचे झाड दोन दिवसांपूर्वी सकाळी अचानक नामशेष झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
४० फूट उंच गोरखचिंचेच्या या झाडाला सांताक्रूझचा ‘ज्येष्ठ नागरिक’ म्हणून ओळखलं जायचं. या परिसराच्या इतिहासाचा आणि रहिवाशांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग मानला जात असे. मात्र मुंबई मेट्रो -२ बीसाठी उभारण्यात येणाऱ्या सांताक्रूझ स्थानकाच्या उभारणीमध्ये हे झाड अडसर ठरत असल्याने त्याची एमएमआरडीएकडून रातोरात कत्तल करण्यात आल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणण आहे.
हे झाड तोडू नये म्हणून परिसरातील नागरिकांनी मोर्चाही काढला होता. नागरिकांच्या प्रयत्नाने हे झाड इतके दिवस टिकले होते, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (बीएनएचएस) माजी सचिव अशोक कोठारी आणि इतिहास संशोधक देबाशीष चक्रवर्ती यांनी दिली. ‘१९७९ मध्ये जेव्हा एसव्ही रोडवरील झाडे तोडण्याच्या हालचाली सुरू होत्या, तेव्हा देबी गोएंका यांच्यासोबत मिळून हे झाड वाचवण्यासाठी आम्ही मोर्चा काढला होता. या मोर्चात शाळकरी मुलांसोबत माझी लहान मुलगीही सामील झाली होती.’ अशी आठवण अशोक कोठारी यांनी सांगितली.
मेट्रो रेलच्या अधिकाऱ्यांना बराच काळ हे झाड तोडायचं होतं, असा आरोप या झाडाच्या रक्षणार्थ आयोजित लढ्यात सामील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या रेगेन क्रेडो यांनी केला. 'जुने गोरखचिंचेचे झाड तोडल्याची बातमी मिळताच मी त्या झाडाच्या जागेवर गेले. तेथील दृश्य आमच्यासाठी धक्का देणारं होतं. झाडाचं एकही पान शिल्लक राहिलं नव्हतं. बुंध्यासकट झाड कापून तेथे सिमेंट भरण्यात आलं होतं. जणू काही पूर्वी तेथे काही अस्तित्वातच नव्हतं' असं क्रेडो म्हणाल्या.
दरम्यान, राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी ३०० वर्ष जुनं गोरखचिंचेच झाड कापल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना (ठाकरे गटाचे) सरकार सत्तेवर आल्यानंतर हे झाड तोडणाऱ्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
गोरखचिंचेचं हे झाड वाचवण्यासाठी सांताक्रूजच्या रहिवाशांनी ‘ट्री लव्हर्स’ नावाची संघटना स्थापन केली होती. या संघटनेच्या कार्यकर्त्या आदिती जयकर म्हणाल्या, ‘हे खूप मोठं नुकसान आहे. आम्हा सर्वांचं या झाडाशी भावनिक नातं होतं. आमच्यापैकी कुणालाही झाड तोडणार असल्याची कल्पना नव्हती. आम्ही किमान या झाडाच्या प्रत्यारोपणासाठी तरी लढा दिला असता.’ असं जयकर म्हणाल्या.
१९७९ साली सांताक्रूजमधील एसव्ही रोडवरील झाडे तोडण्याच्या हालचाल सुरू झाल्यानंतर येथील नागरिकांनी गोरखचिंचेच्या या झाडापासून वांद्रे येथील भाभा रुग्णालयासमोरील झाडापर्यंत ‘बाओबाब ते बाओबाब’ असा मोर्चा काढला होता.
दरम्यान, १५ वर्षांपूर्वी हे झाड वाचविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर एका बिल्डरने जवळच्या विलिंग्डन कॉलनीतील बरीच जुनी झाडे तोडल्यामुळे २०१६ मध्ये पुन्हा संघर्ष करावा लागला होता. तेव्हाच सांताक्रूझच्या ‘ट्री लव्हर्स’ या आंदोलनाचा जन्म झाला. झाडांबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी नागरिकांनी या झाडाचा सत्कारही केला होता. त्यानंतर या आणि रस्त्यालगतच्या इतर झाडांना सेंद्रिय खते देऊन झाडाची मुळे मजबूत करण्यात आली होती. शिवाय झाडावर पोस्टर्स चिकटवण्यात आली होती. २०२१ साली काही कार्यकर्त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे झाड न तोडण्याची विनंती केली होती. रस्त्यालगतची इतर झाडे तोडावी लागतील, मात्र गोरखचिंचेचं झाड तोडलं जाणार नाही, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली होती. तत्कालीन शिवसेना सरकारचा झाडे न तोडण्याबद्दल अधिकाऱ्यांवर दबाव होता' असं क्रेडो म्हणाल्या.
हेही वाचाः जागरूक ठाणेकरांची 'माझा तलाव' मोहीम!
दरम्यान, सर्व रितसर परवानग्या आणि प्रक्रिया पूर्ण करून हे झाड तोडण्यात आले आहे. हे झाड तोडण्यासाठी महापालिकेने नोटिसा दिल्या होत्या आणि जानेवारी महिन्यात वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही देण्यात आली होती. या झाडाबाबत वृक्षतज्ज्ञांचा सल्ला घेतला असता या झाडाची रुंदी खूप असल्याने त्याचे दुसऱ्या ठिकाणी प्रत्यारोपण शक्य नसल्याचे तज्ञांनी सांगितले होते, असं मेट्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
गोरखचिंच (Baobab tree) झाडाची रोपे ३०० वर्षापूर्वी आफ्रिकेच्या मादागास्कर देशातून आलेल्या व्यापाऱ्यांनी मुंबईत आणली होती. येथे आणल्यानंतर पोर्तुगीजांनी ती विकत घेऊन लावली होती. या रस्त्यावरून फक्त घोडे आणि बैलगाड्या जात असल्याच्या काळापासून हे झाड तिथे होत. गोरखचिचेचे झाड परिसर थंड ठेवतात. या झाडाला प्रचंड मोठा मुकुट असल्याने मोठी सावली पडते, अशी माहिती जयकर यांनी दिली. हे झाड तब्बल २००० वर्षांपर्यंत जगू शकतो. या झाडाच्या खोडात ८००० लिटर पाणी मावते, असं तज्ञांचं मत आहे.