
ठाणे हे तलावांचे शहर आहे. येथे पूर्वी ६० तलाव होते अशी ऐतिहासिक नोंद आहे. परंतु आता त्यामधील केवळ ४२ अस्तित्वात आहेत. इतर तलाव अतिक्रमण व दुर्लक्षामुळे बुजले गेले व हरवले. आपल्या या जलसंपदेचे रक्षण करणे हे स्थानिक प्रशासनासोबत अशासकीय संस्थांचे व सामान्य नागरिकांचेही काम आहे. पर्यावरण दक्षता मंडळाने गेल्या २४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासामध्ये पर्यावरण शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने पर्यावरण संवर्धनाची मोहीम अधिक परिणामकारकरीत्या राबवता येते व सहभागी विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय बदल आढळतो. म्हणूनच या कामामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांचा सहभाग असणे आवश्यक आहे.
ठाणे महानगरातील ४२ तलाव हे विविध शाळा वा महाविद्यालयांना दत्तक दिल्यास त्या शाळा / महाविद्यालयाने नेमलेला शिक्षक / प्राध्यापक, त्यामधील सर्व वर्गातील स्वयंसेवक (३०/३५ विद्यार्थ्यांचा चमू) आणि पर्यावरण दक्षता मंडळाचे तज्ज्ञ मार्गदर्शक या तलावाच्या संवधर्नावर सतत लक्ष ठेऊ शकतात. या समितीमधील विद्यार्थी त्या परिसरातील असल्यामुळे नेहमी तलावाला भेट देऊन आपली निरीक्षणे नोंदवू शकतात. ही सर्व निरीक्षणे योग्य त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम पर्यावरण दक्षता मंडळ करेल.
महानगरपालिकेने आता काही संस्थांना त्या तलावाचे संवर्धन तसेच मासेमारी / बोटिंग असे काही परवाने दिले आहेत. या सर्व संस्था त्यांच्या जबाबदारीचे कशाप्रकारे वहन करतात याचे तसेच या तलावांना भेट देणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करून ते तलाव कशाप्रकारे स्वच्छ व पर्यावरणसहयोगी ठेवतात याचे निरीक्षण केले जाईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या साहाय्याने येथील नियमित भेट देणाऱ्यांचे भेटवृत्त / निरीक्षणे संकलित करून त्याचा अहवाल प्रकाशित केला जाईल.
अशा प्रकारे स्थानिकांच्या विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने हे काम केल्यास 'माझा तलाव' ही आपलेपणाची भावना निर्माण होईल आणि त्यातून या तलावांचे निश्चितच संवर्धन होईल.
पर्यावरण दक्षता मंडळ आपल्या २५व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 'जलसाक्षरता' कार्यक्रमांतर्गत 'माझा तलाव' ही योजना पर्यावरण दिनाच्या निमित्ताने म्हणजेच आज ५ जून २०२३ रोजी सुरु करण्यात आली.
संबंधित बातम्या
