Pune viral News : पुण्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. या सध्या हंगाम असल्याने ही झाडे आंब्यांनी लगडली आहेत. हे आंबे तोडून खाण्याचा मोह अनेकांना होतो. मंगळवारी असाच एक १०० किलोचा व्यक्ति १०० फुट उंच असलेल्या आंब्याच्या झाडावर आंबे तोडण्यासाठी चढला. मात्र, अचानक तो झाडावरच बेशुद्ध पडला. सुदैवाने हा व्यक्ति झाडांच्या फांद्यांमध्ये अडकला. दरम्यान, ही बाब झाडांखालून जणाऱ्यांना निदर्शनास आली. एक व्यक्ति बेशुद्ध अवस्थेत झाडावर अडकून पडला असल्याने त्यांनी ही बाब अग्निशामक दलाला कळवली. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी येत त्यांनी या बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. ही घटना मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली.
कोथरूड येथे दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास कोथरुडच्या अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला एक इसम आंब्याच्या झाडावर बेशुद्ध अवस्थेत अडकून असल्याचा फोन आला. कोथरुडच्या पौड रोड भागात कृष्णा हॉस्पिटलजवळ एका इमारतीच्या मागच्या बाजूला झाडावर हा इसम अडकला होता. ही माहिती मिळताच अग्रिशमन दलाची गाडी आणि रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाली.
अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना एक व्यक्ति हा उंच आंब्याच्या झाडावर तीन फांद्याच्या मधोमध अडकलेल्या स्थितीत आढळला. घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच जवानांनी दलाकडील शिडी झाडाला लावून झाडावर चढले. त्यांनी या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले. जवानांनी तातडीने रश्शी, दोर याचा वापर करुन रेस्क्यु बेल्टच्या साह्याने तसेच त्याचे वजन अंदाजे शंभर किलोच्या आसपास असल्याने विषेश गाठीचा उपयोग करुन त्याव्यक्तीला हळूहळू व कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत सुमारे ३० मिनिटात झाडावरुन खाली उतरवले. यानंतर त्याला तातडीने अँब्युलंस मधून रुग्णालयात उपचाराकरिता रवाना करण्यात आले.
ही कामगिरीत अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, तांडेल आंगद लिपाणे, वाहनचालक महेश शिळीमकर, शरद गोडसे, फायरमन रोशन हरड, वैभव आवरगंड, रविंद्र बडे, प्रतीक पागसे, मारुती देवकुळे, कृष्णा नरवटे, महेश घुले, सुबोध भुतकर, परेश जाधव यांनी सहभाग घेतला.