Maharashtra Weather Update : राज्यात सूर्य आग ओकत आहे. तापमानाने उच्चांक गाठला आहे. ही उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला आहे. प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना व नांदेड जिल्ह्यात ही उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात अल आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे तसेच बाहेर जातांना टोपी, रुमाल, स्कार्फ, गॉगल लाऊन बाहेर पडावे आणि सोबत पाण्याची बॉटल ठेवावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणाच्या खालच्या स्थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही दक्षिण पुर्व मध्य प्रदेश ते कर्नाटक पर्यंत जात आहे. ही द्रोणीका रेषा विदर्भ आणि मराठवाड्यातून जात आहे. त्यामुळे आज कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता, मराठवाडा ते विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस वातावरण उष्ण व दमट राहील. मुंबई व रायगडला आज तर ठाण्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना व नांदेडला पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर मराठवड्यातील लातूर, उस्मानाबादला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भात आज अकोला आणि बुलढाणा वगळता इतर जिल्ह्यात मेघ गर्जना वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि परिसरात पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहील, पुण्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. २ मे ते ६ मे पर्यंत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुण्यात मंगळवारी ४१.७ डिग्री सेल्सिअस तपमानची नोंद झाली. पुण्याच्या तपमानंत पुन्हा वाढ होणार असल्याने नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. तसेच बाहेर पडतांना स्कार्फ, रुमाल, टोपी, गॉगल, तसेच छत्री घेऊन बाहेर पडावे तसेच पाण्याची बॉटल सोबत ठेवावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मंगळवारी मुंबईत ३४.१, सांताक्रुजमध्ये ३८.१, अलिबागमध्ये ३३.५ आणि डहाणूत ३५ सेल्सिअस तापमान होते. आज, बुधवारीही ठाणे, रायगड, मुंबईला उष्णतेसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात सध्या दक्षिणोत्तर वारा खंडितता प्रणाली तयार झाली आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेही उकाडा जाणवत आहे. पुढील दोन-तीन दिवस अशीच स्थिती राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.