पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Pm Narendra Modi) पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सभा घेत मावळ, शिरुर, बारामती व पुणे मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले. यासभेत मोदींनी पवारांचा उल्लेख चक्क भटकती आत्मा असा केल्यानं राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. मोदी म्हणाले की, स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे एक अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतेय, त्यांच्यामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता असून त्यांनी स्वत:चा पक्ष व कुटूंबही अस्थिर केल्याचा घणाघात मोदींनी केला. त्यावरून आता पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केला आहे.
भटकती आत्मावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात वार-पलटवार सुरू झाले आहेत.शरद पवारांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, होय मी भटकती आत्मा आहे, जनतेच्या हितासाठी त्यांच्या कल्याणासाठी मी शंभर वेळा अस्वस्थ राहीन. गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, असा टोला संजय राऊतांनी मोदींना लगावला. तर शरद पवारच महाराष्ट्राचा आत्मा असल्याचे जयंत पाटलांनी म्हटले आहे. आता उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेत आपल्या खास शैलीत मोदींवर पलटवार केला आहे.
महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, पुण्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मविआची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत महायुतीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
उद्धव ठाकरे म्हणाले काल पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा झाली. यात ते पवार साहेबांबाबत काय बोलले? त्यांची भाषा इतकी खाली जात आहे. त्यावर अजित पवार म्हणतात की, मी पुढच्या सभेला मोदींना विचारेन की, ते भटकती आत्मा कुणाला म्हणाले? तुम्ही भटकती आत्मा कोणाला म्हणालात, शरद पवारांना म्हणालात? भटकती आत्मा जशा असतात तसा वखवखलेला आत्माही असतो. हा वखवखलेला आत्मा सगळीकडे फिरत असतो, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी मोदींवर केली.
पंतप्रधान मोदींनी पुण्यातील सभेसाठी ठिकाणही योग्य निवडलं,कोणते तर रेसकोर्स. कारण त्यांना झोपेत सुद्धा घोडेबाजार दिसतो. पण त्यांना कोणीतरी सांगायला हवं की, हे घोडे वेगळे होते आणि तुम्ही ज्यांना घोडे समजता व आपल्याकडे घेतला ते घोडे नसून खेचरं आहेत. खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात, रथाचे असतात. टरबुजाला घोडा लागत नाही तर हातगाडी लागते असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचे नाव न घेता लगावला.