Mallikarjun Kharge on PM Modi : लोकसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेस एकमेकांवर जोरदार टीका करतांना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरवर टीका करताना ‘काँग्रेसला सत्ता मिळाली तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल. काँग्रेस लोकांची संपत्ती लुटून मुस्लिमांना वाटेल’, अशी टीका केली होती. मोदी यांच्या या टीकेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. त्यांनी मोदी यांना त्यांच्या वक्तव्यावरुण टोलाही लावला आहे. खरगे म्हणाले, “मुस्लिमांचं काय घेऊन बसलात?, मलाही ५ मुलं आहेत”.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व मित्र पक्षांना बहुमत मिळण्याचा दावा केला. तसेच भाजपा फक्त अल्पसंख्याक समुदायालाच का लक्ष्य करत आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे मुद्दे नसल्याने ते त्यांच्या भाषणात मंगळसूत्र आणि मुस्लिमांचा उल्लेख करत असल्याचे त्यांनी सांगितले. "आम्ही बहुमत मिळवणार आहोत आणि म्हणूनच मोदी नेहमीच मंगळसूत्र आणि मुस्लिमांबद्दल बोलत असतात.
खरगे म्हणाले, "गरीबांना नेहमीच जास्त मुले असतात. फक्त मुस्लिमांनाच मुले असतात का? मला पाच मुले आहेत." छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात एका निवडणूक सभेत खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना हे उत्तर दिले आहे.
खरगे म्हणाले, “मी एकुलता एक होतो. माझी आई, बहीण आणि काका आता हयात नाहीत. एकदा माझे घर जाळले. ते का जाळले, यामध्ये मी आता जाणार नाही. गरिबांना मुले होतात. मग नरेंद्र मोदी हे फक्त मुस्लिमांबद्दलच का बोलतात? मात्र, दिशाभूल करण्याचे काम करु नका. हा देश घडवायचा आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे चालायचे आहे”,
देशात ५५ वर्षे काँग्रेसची सत्ता असून त्यांनी कोणाचे मंगळसूत्र चोरले नाही. "आम्ही जबरदस्तीने कर लादले आणि लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा गैरवापर केला का? काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी धाडस दाखवून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा आणला. भाजपने असा काही कायदा केला का? आम्ही अन्न सुरक्षा कायदेही आणले. ही आमची हमी आहे असे आम्ही म्हटले नाही, परंतु देशात कोणीही उपाशी राहू नये आणि कोट्यवधी लोकांना फायदा व्हावा यासाठी आम्ही हे केले आहे.
जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांसारख्या माजी पंतप्रधानांशी पंतप्रधान मोदींची तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. अशा व्यक्तीची तुलना पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी यांच्याशी करता येईल का? त्यांच्या तुलनेत मोदी काहीच नाही.
पीएम मोदी हे खोटे बोलण्याचे धनी आहेत, ते खोट्यानंतर खोटे बोलतात, असा आरोप खरगे यांनी केला. ते कधीच गरिबांची बाजू घेत नाही, फक्त बोलतात. भाजपवाले गरिबांचे नाही तर अदानी आणि अंबानींचे उत्पन्न वाढवतात.
खरगे म्हणाले की, पीएम मोदी आणि भाजप कार्यकर्ते नेहमी ४०० पारचा नारा देत आहेत, मात्र हा नारा गरीब, मागास, आदिवासी आणि दलितांच्या हिताचा नसून सर्वच घटकांचे हक्क संपवण्यासाठीच ४०० पारची भाषा बोलत आहेत. आम्हाला बहुमत मिळाले तर संविधान बदलू, असे ते सर्वत्र सांगत आहेत.