Jharkhand Weather Report: झारखंडमध्ये सूर्यदेवाचा प्रकोप झाला आहे. येथे सर्वात मोठी उष्णतेची लाट आली आहे. पूर्व सिंगभूम मंगळवारी जिल्ह्यातील बहरगोरा येथे तब्बल ४७.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान देशातील आता पर्यंतचे सर्वाधिक तापमान म्हणून नोंदवले गेले. प्रचंड उष्णतेमुळे दोन जण बेशुद्ध झाले तर एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हवामान खात्याने बुधवारी झारखंडमधील ११ जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी झारखंडमधील ११ जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सध्याच्या आकड्यापेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना गरज असल्यास घराबाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कडक उन्हात मंगळवारी दुपारी दुमका बसस्थानकाजवळ दोन जण बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. दुमका शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी अमित कुमार लाक्रा यांनी सांगितले की, दोघांना फुलो झानो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका व्यक्तीला काल रात्री डॉक्टरांनी मृत घोषित केले तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. ३२ वर्षीय शिवकुमार मंडल असे मृत तरुणाचे नाव आहे. या व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला की अन्य कारणाने झाला, हे शवविच्छेदनानंतरच कळेल, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अनुसन पूर्ती यांनी सांगितले.
डॉक्टर अनुसन पूर्ती यांनी सांगितले की, उपचार घेत असलेल्या अन्य व्यक्तीच्या रक्ताचे नमुने देखील घेतले जातील जेणेकरुन बेशुद्ध होण्यामागचे कारण कळू शकेल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, साहिबगंज, गोड्डा, पाकूर दुमका, जामतारा, देवघर, धनबाद, बोकारो, सरायकेला-खरसावन, पूर्व आणि पश्चिम सिंगभूममध्ये मंगळवारी तीव्र उष्णतेची लाट आली. प्रखर ऊन आणि उष्णतेची लाट ही बुधवारीही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पूर्व सिंगभूम जिल्ह्यातील बहरागोरा येथे मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान ४७.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जमशेदपूर, गोड्डा आणि सरायकेला येथे ४५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पलामू आणि पाकूरमध्ये कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस होते तर डाल्टनगंजमध्ये कमाल तापमान ४३.८ अंश सेल्सिअस होते. झारखंडची राजधानी रांचीमध्येही तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे सामान्यपेक्षा ३.४ अंश जास्त आहे.
रांची हवामान केंद्राचे प्रभारी अभिषेक आनंद यांनी सांगितले की, जवळजवळ अर्धा झारखंड उष्णतेने होरपळला आहे. झारखंडमध्ये पुढील ४८ तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार झारखंडमधील तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. आयएमडीने केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने केरळच्या पलक्कड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे.
संबंधित बातम्या