Maharashtra Weather Update: राज्यात तापमानात मोठे चढ उतार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमान वाढ तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना आणि वीजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात उष्णतेची लाट तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथे २८ एप्रिल पर्यंत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याने या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, द्रोणिका रेषा आज मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत कर्नाटक मधून जात आहे. कोकण गोव्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे, तसेच कोकण गोव्यात पुढील ३ दिवस तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये पुढील पाच ते सहा दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट सहित वादळी वारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा आणि पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात वादळी वाऱ्याची गती ताशी ४० ते ५० किलोमीटर इतकी राहील.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर २४ व २६ एप्रिल मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. असे असले तरी कमाल व किमान तापमानात मात्र फारसा बदल होणार नाही.
मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथे २८ एप्रिल पर्यंत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर, चंद्रपूर, वर्धा येथे गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.