Alephata leopard news : बिबट्याने मानवी वसाहतीत प्रवेश करणं ही काही नवीन बाब राहिली नाही. मंगळवारी रात्री मात्र बिबट्याने थेट पुण्यातील रुग्णालयातच प्रवेश केला. सुदैवाने रात्र असल्याने आणि रुग्णालयाच्या वॉर्डचे दरवाजे बंद असल्याने, दवाखान्यातून बिबट्या बाजूच्या इमारतीत घुसला. भक्षाच्या शोधात हा बिबट्या खाजगी रुग्णालयाच्या इमारतीत पोहचला होता. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता.
या घटनेची तातडीने वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. बिबट्याच्या हल्यात एक दुचाकीस्वार आणि एक वनसंरक्षक जखमी झाला. बिबट्याने इमारतीतून लगतच्या पत्र्यावर झेप घेतली अन तिथून शेजारच्या जंगलात पळ काढला. तब्बल तासभर चाललेला हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
आळेफाटा (ता जुन्नर) चौकापासून जवळच असलेल्या वस्तीतुन पुणे नाशिक महामार्ग ओलांडताना बिबट्याने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. यानंतर हा बिबट्या थेट जवळच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या रुग्णालयात घुसला.रुग्णालयाचे दरवाजे बंद असल्याने तसेच नागरिकांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्या शेजारी इमारतीत घुसला. यावेळी येथील रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. सव्वा तासानंतर हा बिबट्या या बिल्डिंगमधून बाहेर आला.
मंगळवारी (दि २६) रात्री १० च्या च्या सुमारास आळेफाटा चौकापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या भरवस्तीत एक बिबट्या घुसला. हा बिबट्या पुणे नाशिक महामार्ग रस्ता ओलांडून पळत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला धडकला. यामध्ये रामजी वर्मा हा दुचाकीस्वार जखमी झाला. यानंतर हा बिबट्या थेट रस्त्याशेजारी असणाऱ्या रुग्णालयात घुसला. मात्र, सुदैवाने दरवाजे बंद असल्याने त्याला आत जाता आले नाही. यानंतर शेजारी असलेल्या पांडुरंग नरवडे यांच्या पांडुरंग कृपा या बिल्डिंगमध्ये हा बिबट्या घुसला. यावेळी इमारतीत राहणाऱ्या नागरिकांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी दरवाजे लावून घेतले. त्यानंतर हा बिबट्या जिन्याने चढून टेरस वर जाऊन बसला. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. त्यांनी वनविभागाला पाचारण करण्यात आले. वनविभागाचे वनरक्षक कैलास भालेराव घटनास्थळी आले. त्यानंतर काही वेळाने रेस्क्यू टीम आली. दुसऱ्या बाजूने बिल्डिंग वर चढून त्यांनी बिबट्यास खाली आणले. मात्र बिबट्या खाली येत असताना घरच्या पत्र्याच्या शेडवर लपून बसला. जवळपास एक तासानंतर बिबट्या बिल्डिंगमधून बाहेर आला व त्याने आळेफाटा चौकातल असलेल्या वस्तीतुन पुढे धुम ठोकली.
दरम्यान, बिल्डिंगमध्ये घुसलेल्या बिबट्यास बाहेर काढण्यासाठी गेलेल्या रेस्कु टीममधील आळे वनपरिक्षेत्रेचे वनरक्षक कैलास भालेराव यांचेवर बिल्डिंगमधून बाहेर पडणा-या बिबट्याने हल्ला केला यामध्ये त्यांचे हाताला जखम झाली. मात्र प्रसंगावधान राखल्याने व इतर रेस्कु टीममधील सदस्यांनी मदत केल्याने ते या हल्ल्यात थोडक्यात बचावले.