मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gajanan Kirtikar: आता बस्स झालं! ईडी विरोधात लोकांमध्ये भयंकर चीड; शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांनी भाजपला सुनावले!

Gajanan Kirtikar: आता बस्स झालं! ईडी विरोधात लोकांमध्ये भयंकर चीड; शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांनी भाजपला सुनावले!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 12, 2024 04:49 PM IST

Gajanan Kirtikar on ED : भारतीय जनता पक्षानं आता ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर थांबवला पाहिजे, असं स्पष्ट मत शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केलं आहे.

आता बस्स झालं! ईडी विरोधात लोकांमध्ये भयंकर चीड; शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे रोखठोक बोल
आता बस्स झालं! ईडी विरोधात लोकांमध्ये भयंकर चीड; शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे रोखठोक बोल

Gajanan Kirtikar on ED : ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांवरून देशातील विरोधी पक्ष सातत्यानं मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत असतात. मात्र, आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार गजानन कीर्तीकर यांनीच ईडी कारवायांवर संताप व्यक्त केला आहे. आता बस्स झालं,' असं कीर्तीकर यांनी सुनावलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गजनान कीर्तीकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते शिंदे गटात असून त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. ठाकरेंनी अमोल यांनाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं कीर्तीकर यांनी माघार घेतली आहे. आता शिंदे गटाला तिथं उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या विरोधात ईडीचा ससेमिरा लागला आहे. करोना काळात खिचडी घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी दोन वेळा त्यांची चौकशी झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तपास यंत्रणांच्या कारवाईवर त्यांनी त्रागाही व्यक्त केला.

ई़डीचे प्रयोग करण्याची आता गरज नाही!

ईडीचे प्रयोग करण्याची आता गरज नसल्याचं मत कीर्तीकर यांनी व्यक्त केलं. भाजपला देशभरातून भक्कम पाठिंबा आहे. मात्र ईडीमुळं जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे. लोक या कारवायांना कंटाळले आहेत. ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत असल्याचं ते म्हणाले.

‘नरेंद्र मोदींनी पुढची पाच काय, दहा वर्षे नेतृत्व करावं. देशातील जनता २०२४ च्या निवडणुकीत त्यांच्या मागे उभी राहणार आहे, हे सत्य आहे. मात्र ४०० पारच्या नाऱ्याला चुकीचा दर्प येता कामा नये. महाराष्ट्रातील भाजपचे काही लोक ज्या पद्धतीनं वागतात, ते चुकीचं आहे,’ असंही कीर्तीकर म्हणाले.

अमोल विरोधातील कारवाईचा राग

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा नेता म्हणून मी अमोल कीर्तीकरांच्या विरोधात प्रचार करणार आहे. मात्र, अमोल यांच्याविरोधात सुरू असलेल्या ईडी कारवाईचा मला राग येतो. अमोल असो किंवा सूरज चव्हाण यांच्यावर खिचडी प्रकरणात घोटाळ्याचे आरोप आहेत. हे आरोप साफ चुकीचे आहेत, असं गजानन कीर्तीकर म्हणाले.

खिचडी प्रकरणावर गजानन कीर्तीकर काय म्हणाले?

'हे प्रकरण करोना काळातील आहे. त्या काळात सर्व काही तात्काळ हवं होतं. जम्बो हॉस्पिटल सुरू करावं लागलं. डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ, वैद्यकीय साहित्य, बेड, बेडशीट, स्वच्छता या सगळ्या गोष्टींची गरज होती. ती गरज भागवण्यासाठी पुष्कळ पुरवठादार पुढं आले. त्याचवेळी रुग्णांना खिचडी देण्यासाठी पुरवठादार हवा होता. आमच्या शिवसेनेचे संजय म्हशीलकर यांनी एक कंपनी स्थापन केली. सूरज चव्हाण व अमोल कीर्तीकर त्यांना मदत करत होते. ते काही भागीदार नव्हते. करोना काळात या पुरवठा साखळीत काम करणं धोकादायक होतं. पण सामाजिक भावनेतून त्यांनी काम केलं होतं. तो व्यवसाय असल्यानं म्हशीलकर यांच्या कंपनीला नफा झाला. त्यातून अमोल कीर्तीकर व सूरज चव्हाण यांना काही मानधन मिळालं. ते बँकेत आलं. इन्कम टॅक्सच्या कक्षेत आलं. त्यात कुठलंही मनी लाँड्रिंग नाही. या संदर्भातील सगळी कागदपत्रं समोर आहेत, त्याचा तपास ईडीनं केलेला आहे.

व्यवसाय करणं आणि त्यातून नफा कमावणं हा काही फौजदारी गुन्हा नाही. त्यासाठी अटकेची गरज नाही. मात्र, त्यासाठी अमोल यांना दोनदा चौकशीसाठी बोलावलं गेलं. पहिल्या वेळी जे प्रश्न विचारले, तेच दुसऱ्यांदा विचारले गेले. यातून हाती काही लागणार नाही हे ईडीच्या अधिकाऱ्यांनाही माहीत आहे, पण टेन्शन देण्याचं काम सुरू आहे, असं कीर्तीकर म्हणाले.

IPL_Entry_Point