AAP warns BJP against president Rule in Delhi : दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं कटकारस्थान भारतीय जनता पक्षानं रचल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. या हालचाली बेकायदेशीर आणि लोकमताच्या विरोधात असल्याचं 'आप'नं म्हटलं आहे.
दिल्ली सरकारमधील मंत्री आणि 'आप'च्या नेत्या आतिषी यांनी पत्रकार परिषद घेऊन आज हा आरोप केला. केंद्र सरकार येत्या काही दिवसांत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणार असल्याची माहिती आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मागील काही महिन्यांपासून त्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. हे पटवून देताना आतिशी यांनी पाच गोष्टींकडं लक्ष वेधलं आहे.
दिल्लीत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात नाही.
दिल्लीतील अनेक विभागांमध्ये रिक्त पदे आहेत, परंतु तिथं एकही अधिकारी नियुक्त केला जात नाही.
नायब राज्यपाल हे गेल्या आठवडाभरापासून गृहमंत्रालयाला कोणतंही कारण नसताना वारंवार पत्रं लिहीत आहेत. मंत्री बैठकीला येत नसल्याचं सांगण्यात येत आहे.
दिल्ली सरकारमध्ये नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे कारण देत बैठकांना उपस्थित राहणं बंद केलं आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाला २० वर्षे जुन्या खटल्याचं निमित्त करून बडतर्फ करण्यात आलं आहे.
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणं बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि दिल्लीच्या जनतेच्या इच्छेच्या विरोधात असेल, असा इशारा आतिशी यांनी भाजपला दिला. दिल्लीच्या जनतेनं अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला स्पष्ट कौल दिला आहे, याकडं त्यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे दिल्लीच्या जनतेत प्रचंड संताप असून लोकसभा निवडणुकीत लोक भाजपला सडेतोड उत्तर देतील, असा दावा आतिशी यांनी केला आहे.
दिल्लीत भाजप निवडणूक जिंकू शकत नाही. दिल्लीच्या जनतेत केजरीवाल लोकप्रिय आहेत. दिल्लीकर आम आदमी पक्षालाच मतदान करणार हे भाजपला माहीत आहे. त्यामुळंच केंद्र सरकारनं खोट्या आरोपाखाली त्यांना अटक केली आहे. केजरीवाल सरकार पाडण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप आतिशी यांनी केला आहे.
दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणातील अनियमितता प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली आहे. या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.