Raj Thackeray backs Mahayuti : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजप, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता राज ठाकरे प्रत्यक्ष प्रचारात उतरून भाजप आणि महायुतीसाठी जाहीर सभा घेणार का, याविषयी उत्सुकता आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर भाजपनं शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पाडून त्यातील नव्या पक्षांसह महायुती स्थापन केली आहे. या महायुतीत राज ठाकरे यांच्या मनसेला घेण्याचाही प्रयत्न होता. मात्र, काही कारणांमुळं मनसेनं प्रत्यक्ष महायुतीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. मात्र राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. नरेंद्र मोदी यांच्यासारखं खंबीर नेतृत्व हवं आहे. त्यांच्यासाठी महायुतीला पाठिंब देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावं असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या भाषणामुळं एक वेगळाच संभ्रम सध्या निर्माण झाला आहे.
मनसेचा महायुतीला पाठिंबा सक्रिय असेल का, राज ठाकरे हे भाजप आणि शिंदे व पवार गटाच्या उमेदवारांसाठी सभा घेणार का, याविषयी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे हे फर्डे वक्ते आहेत. राजकीय वातावरण बदलण्याची, आपला मुद्दा जोरकसपणे मांडण्याची व तो पटवून देण्याची कमालीची हातोटी त्यांच्याकडं आहे. ते प्रचारात उतरल्यास महायुतीला मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशा काही शहरात फायदा होऊ शकतो. मात्र, राज ठाकरे हे प्रत्यक्ष सभा घेणार का याबाबत साशंकता आहे.
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्यांनी तसं कोणतंही सुतोवाच केलेलं नाही. त्यातच भाजपप्रणित महायुतीला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या घोषणेनंतर मनसेमध्ये मोठी नाराजी आहे. आपल्या पक्षानं निवडणूक न लढणं समजू शकतो. मात्र आपण निवडणूक न लढता इतरांना पाठिंबा का द्यायचा, असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत. सोशल मीडियातही राज ठाकरे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकांची चर्चा आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जायचं की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. याबाबत राज ठाकरे हे स्वत: निर्णय घेतील. येत्या १३ एप्रिल रोजी राज ठाकरे बैठक घेणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असं मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितलं.
संबंधित बातम्या