Rahul Gandhi Reply to Narendra Modi : ‘काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप दिसत असल्याची टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. देशाची फाळणी करणाऱ्यांना कोणी मदत केली होती आणि ब्रिटिशांना कोणी मदत केली होती याचा साक्षीदार इतिहास आहे,' असा घणाघात राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे.
काँग्रेसनं अलीकडं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. 'न्याय पत्र' असं नाव या जाहीरनाम्याला देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर टीका केली होती. काँग्रेस देशात भेदभावाला चालना देऊन फूट पाडत आहे. त्यांच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची (Muslim League) छाप दिसते, असा आरोप मोदी यांनी केला होता.
राहुल गांधी यांनी आज मोदींच्या या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं. ‘कोणी कितीही खोटे दावे केले तरी इतिहास बदलत नाही. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही दोन विचारधारांमधील लढाई आहे. एका बाजूला भारताला नेहमीच एकसंध ठेवणारी काँग्रेस आहे आणि दुसरीकडं नेहमीच लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारा भाजप आहे, असं राहुल यांनी 'एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'देशाची फाळणी करू इच्छिणाऱ्या आणि त्यांना बळ देणाऱ्या शक्तींशी कोणी हातमिळवणी केली आणि देशाच्या एकता आणि स्वातंत्र्यासाठी कोणी लढा दिला हे इतिहासाला माहीत आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
'भारत छोडो आंदोलनात इंग्रजांच्या पाठीशी कोण उभं राहिलं? जेव्हा भारतातील तुरुंग काँग्रेस नेत्यांनी भरले होते, तेव्हा देशाची फाळणी करणाऱ्या शक्तींसह राज्यांमध्ये सरकार कोण चालवत होतं? राजकीय व्यासपीठावरून खोटारडेपणाचा वर्षाव करून इतिहास बदलत नाही, असा टोला राहुल गांधी यांनी हाणला.
'मोदींच्या भाषणात आरएसएसची दुर्गंधी आहे, भाजपचा निवडणूक आलेख दिवसेंदिवस घसरत चालला आहे, त्यामुळं आरएसएसला आपला सर्वात जवळचा मित्र म्हणजे मुस्लीम लीगची आठवण येऊ लागली आहे. मोदी-शहा यांच्या वैचारिक पूर्वजांनी १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनाला विरोध केला होता. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी १९४० च्या दशकात बंगाल, सिंध आणि एनडब्ल्यूएफपीमध्ये मुस्लिम लीगसोबत युती करून आपलं सरकार कसं स्थापन केलं हे सर्वांना माहीत आहे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
मुस्लिम लीग आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी भारताचे विभाजन करून स्वतंत्र मुस्लिम आणि हिंदू राष्ट्रे स्थापन करण्याची मागणी केली होती. १९४७ मध्ये पाकिस्तानच्या स्थापनेनंतर मुस्लिम लीग हा पाकिस्तानचा प्रमुख राजकीय पक्ष बनला. सहारनपूर येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी याच मुस्लिम लीगशी काँग्रेसचा संबंध जोडला होता. त्यावरून आता काँग्रेसनं त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.