मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded : अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?; गिरीश महाजनांच्या वक्तव्यानं संभ्रम आणखी वाढला!

Nanded : अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?; गिरीश महाजनांच्या वक्तव्यानं संभ्रम आणखी वाढला!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 05, 2022 12:08 PM IST

Girish Mahajan In Nanded : भाजप नेते आणि मंत्री गिरीष महाजन हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

girish mahajan and ashok chavan
girish mahajan and ashok chavan (HT)

Girish Mahajan In Nanded : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. तेव्हापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आलेला आहे. त्यातच आता मंत्री गिरीष महाजन हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक विधान केलं आहे. त्यामुळं आता भाजप मराठवाड्यात कॉंग्रेसला खिंडार पाडणार का, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, राज्यातील अनेक मोठे नेते भाजपच्या वाटेवर आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी कुणाचंही नाव घेत नाही परंतु फक्त नांदेड जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील अनेक बड्या नेत्यांची भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असल्याचा गौप्यस्फोट गिरीष महाजनांनी केला आहे. त्यामुळं आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.

राज्यातील अनेक नेत्यांना त्यांच्या पक्षाचं भविष्य काय आहे, हे कळत आहे. त्यामुळं बऱ्याच नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे, असंही गिरीष महाजन म्हणाले. त्यामुळं आता त्यांनी नाव न घेता कॉंग्रेस नेत्यांच्या भाजपप्रवेशाबाबत सूचक विधान केलं आहे. त्यामुळं आता राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान औरंगाबादेत शिवसैनिकांना संबोधित करताना ‘जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना सुप्रीम कोर्टानं अपात्र ठरवलं तर मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेसचे २२ आमदार देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देणार असल्याचं’ वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. त्यामुळं आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही भाजप प्रवेशाबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

WhatsApp channel