Nawab Malik ED Case : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आता त्यांची संपत्ती जप्त करण्याची परवानगी ईडीला मिळाली आहे. त्यामुळं नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या संपत्तीवर ईडीकडून टाच आणली जाण्याची शक्यता आहे. संपत्ती जप्त करण्याची परवानगी ईडीला मिळाल्यानंतर आता ईडीचे अधिकारी कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच नवाब मलिकांची मुंबईसह उस्मानाबादेतील प्रॉपर्टी जप्त केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवाब मलिकांची संपत्ती कुठे आणि किती?
माजी मंत्री नवाब मलिक यांची मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमध्ये जमीन आहे. कुर्ल्यात तीन फ्लॅट आणि वांद्रेत दोन फ्लॅट नवाब मलिक यांच्या मालकीचे आहेत. तर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात नवाब मलिक यांच्या मालकीची तब्बल १४७ एकर जमीन आहे. त्यामुळं आता ईडीला जप्तीची परवानगी मिळाल्यानंतर मलिकांची संपूर्ण संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे.
नवाब मलिकांवर आरोप काय?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहिण हसीना पारकरकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिकांवर आहे. याच प्रकरणात ईडीनं मलिकांना फेब्रुवारीत अटक केली होती. त्यानंतर त्यांची लोखंडवाल्यातील काही संपत्तीही ईडीकडून जप्त करण्यात आली होती. नवाब मलिक सध्या न्यायलयीन कोठडीत असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ईडीनं जेव्हा कारवाई केली होती तेव्हा हा संपूर्ण व्यवहार कायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण नवाब मलिकांनी दिलं होतं. याशिवाय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कोणताही आर्थिक व्यवहार केला नसल्याचा दावाही मलिकांनी केला होता. परंतु आता ईडीला त्यांची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मिळाल्यानं येत्या काही दिवसांत त्यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे.