मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bawankule : मी प्रदेशाध्यक्ष असतानाच फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत; बावनकुळेंच्या विधान वादळ आणणार

Bawankule : मी प्रदेशाध्यक्ष असतानाच फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत; बावनकुळेंच्या विधान वादळ आणणार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 18, 2022 04:51 PM IST

Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर आता बावनकुळेंच्या वक्तव्यानं भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Chandrashekhar Bawankule On Devendra Fadnavis In Nagpur
Chandrashekhar Bawankule On Devendra Fadnavis In Nagpur (HT)

Chandrashekhar Bawankule On Devendra Fadnavis In Nagpur : देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांच्याकडे जो-जो समाज गेला, त्यांना न्याय देण्याचं काम फडणवीसांनी केलं आहे. त्यामुळं आता फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असताना ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं वक्तव्य काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर आता बावनकुळेंनी फडणवीसांनाच मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा केल्यानं भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नागपुरातील संत संताजी जगनाडे महाराज यांचं स्मारक आणि आर्ट गॅलरीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोणत्याही समाजाला न्याय देण्याचा प्रश्न आला तेव्हा फडणवीसांनी पुढाकार घेत अनेक समाजघटकांच्या मागण्या मान्य केल्या. परंतु त्यांनी आपल्याकडून कधीही, कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नाही. त्यामुळं आता त्यांना पदावर बसवण्यासाठी नाही तर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवणं ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे.

काल महाविकास आघाडीनं महापुरुषांच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी मुंबईत महामोर्चा काढला होता. त्यावर बोलताना आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवल्या जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळं फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु त्यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत जाणार नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे-फडणवीस सरकारचा नेता कोण असणार?, आणि मुख्यमंत्रीच्या दाव्यावरून येत्या काळात भाजप आणि शिंदे गटात धुसफूस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

IPL_Entry_Point