मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नोकरी संभाळून केलेल्या कष्टाचं झालं चीज; केईएमच्या गार्डनं बॉडी बिल्डिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक

नोकरी संभाळून केलेल्या कष्टाचं झालं चीज; केईएमच्या गार्डनं बॉडी बिल्डिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 18, 2022 02:48 PM IST

Body Building Competition : अमित साटम हे मुंबईतील केईएम रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लोणावळ्यातील बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानं त्यांचं सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे.

Body Building Competition Lonavala Pune
Body Building Competition Lonavala Pune (HT)

Body Building Competition Lonavala Pune : मुंबईतील केईएम रुग्णालयात सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असताना त्यातून वेळ काढून दिवसाला तीन तास व्यायाम करणाऱ्या अमित साटम यांच्या मेहनतीला अखेर यश आलं आहे. कारण अमित यांनी लोणावळ्यातील बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. मेहनतीनं मिळवलेल्या यशामुळं सर्वस्तरातून अमित साटम यांचं कौतुक केलं जात आहे. याशिवाय केईएम रुग्णालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लोणावळ्यात ११ डिसेंबरला झालेल्या महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनद्वारे आयोजित ‘शरदचंद्र श्री २०२२’ या राज्यस्तरिय शरीरसौष्ठव स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलातील सुरक्षा रक्षक अमित सुरेश साटम यांनी ८५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं आहे. साटम हे परळस्थित राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामगिरीमुळं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. साटम यांनी जिंकलेल्या सुवर्णपदकाबद्दल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी व सुरक्षा दल खात्याचे प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Body Building Competition
Body Building Competition (HT)

शरीरसौष्ठव स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे अमित साटम हे २०१४ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक (बक्कल क्रमांक ३५४६) म्हणून कार्यरत आहेत. सुरक्षा दलातील नोकरी सांभाळून ते दररोज तीन तास व्यायाम करण्यासह पाच किलोमीटर धावण्याचा देखील नियमित सराव करायचे. साटम हे गेली पाच वर्षे विविध शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असून एप्रिल २०२२ मध्ये पुण्यातील बालेवाडीतल्या शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या १० स्पर्धकांमध्ये त्यांचा समावेश होता.

Body Building Competition Lonavala
Body Building Competition Lonavala (HT)

अनेक जिल्हास्तरिय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत त्यांनी विविध पुरस्कार पटकावले आहेत. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर त्यांनी अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय कुटुंबियांसोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील वरिष्ठांना व सहकाऱ्यांना दिलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग