सध्या देशभरात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांना सुरुवात झाली आहे. या निवडणुकांदरम्यान देशभरातील वातावरण पूर्णपणे तापले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहे. रणवीर सिंहचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडीओमागचं सत्य काहीतरी वेगळच आहे. रणवीर सिंहचा हा व्हिडीओ खरा नसून, डीपफेक व्हिडीओ आहे.
नुकताच आमिर खानचा देखील एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो काँग्रेससाठी मत मागताना दिसला होता. त्याचवेळी आता रणवीर सिंहचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, काँग्रेससाठी मत मागताना दिसला आहे. मात्र, या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे.
या आधीदेखील बॉलिवूडपासून ते साऊथ स्टार्सपर्यंत अनेक कलाकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) डीपफेक तंत्रज्ञानाचे बळी ठरले आहेत. त्याच वेळी, आता रणवीर सिंह याचा देखील एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह म्हणताना दिसतोय की, 'मोदीजींचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे आमची बेरोजगारी, महागाई, आमचे दुःखी जीवन आणि वेदना यांचा जल्लोष साजरा करणे आहे. कारण भारतवर्ष आता अन्याय काळाकडे वाटचाल करत आहे, इतक्या वेगाने वाटचाल करत आहे की, आपला विकास आपला न्याय मागायला विसरता कामा नये. त्यामुळे विचार करूनच मतदान करा.’ या व्हिडीओच्या शेवटी काँग्रेसला मत द्या अशी टॅगलाईन दिसत आहे. यावरूनच लक्षात येते की, हा एक फेक व्हिडीओ आहे, ज्यामध्ये रणवीरच्या व्हिडीओचा वापर करून त्याचा आवाज बदलण्यात आला आहे.
रणवीर सिंहचा हा व्हिडीओ लक्षपूर्वक पाहिल्यास त्यात त्याचा आवाजही जुळत नाही, हे लगेच लक्षात येते. तसेच, त्याच्या ओठांकडे नीट पाहिलं, तर व्हिडीओतील शब्दांशी त्याच्या ओठांची जुळवाजुळव देखील होत नाही. हा व्हिडीओ रणवीर सिंह नुकताच वाराणसीला गेला होता, त्यावेळचा आहे. यावेळी त्याने पत्रकारांशी संवाद साधला होता. रणवीरच्या याच व्हिडीओशी छेडछाड करून, हा डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आला आहे. त्याचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.