मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने पुन्हा मारली बाजी! पाहा टीआरपी शर्यतीतल्या ‘टॉप ५’ मराठी मालिका

जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने पुन्हा मारली बाजी! पाहा टीआरपी शर्यतीतल्या ‘टॉप ५’ मराठी मालिका

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 19, 2024 12:56 PM IST

२०२४च्या १५व्या आठवड्यात पुन्हा एकदा अभिनेत्री जुई गडकरी हिच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेने पहिला नंबर पटकावत बाजी मारली आहे.

जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने पुन्हा मारली बाजी! पाहा टीआरपी शर्यतीतल्या ‘टॉप ५’ मराठी मालिका
जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने पुन्हा मारली बाजी! पाहा टीआरपी शर्यतीतल्या ‘टॉप ५’ मराठी मालिका

मराठी मालिकांचा या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. २०२४च्या १५व्या आठवड्यात पुन्हा एकदा अभिनेत्री जुई गडकरी हिच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेने पहिला नंबर पटकावत बाजी मारली आहे. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेसोबतच तेजश्री प्रधान हिच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने देखील आपले स्थान टिकवून ठेवले आहे. या आठवड्यात टॉप पाच मालिकांच्या यादीत यावेळी कोणकोणत्या मालिकांचा समावेश झाला आहे, चला एक नजर टाकूया...

ट्रेंडिंग न्यूज

ठरलं तर मग

गेल्या अनेक महिन्यांपासून ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आपलं पहिलं स्थान टिकवून आहे. या मालिकेत सतत काही ना काहीतरी नवीन आणि रंजक कथानक पाहायला मिळत आहे. याशिवाय सायली आणि अर्जुन यांची ही प्रेम कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सायली आणि अर्जुन यांच्यातील जवळीक आता हळूहळू वाढू लागली आहे. दोघांमध्ये प्रेमळ बंध निर्माण होत आहेत. इतके दिवस केवळ एक करार म्हणून टिकवून ठेवलेले हे लग्न आता खऱ्या अर्थानं प्रेमात रुपांतरीत होणार आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. पंधराव्या आठवड्यात या मालिकेने ६.८चा टीआरपी मिळवत पहिलं स्थान पटकावलं आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत सध्या रंजक कथानक पाहायला मिळत आहे. नयना आणि राहुल यांच्या लग्नाची बोलणी सुरू झाली असून, नैनाची आई या लग्नाला आता नकार देताना दिसणार आहे. दुसरीकडे, अद्वैत आणि कला यांनी आता राहुलच्या आईकडून या लग्नासाठी परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र. ही परवानगी देण्याच्या बदल्यात राहुलची आई आता अद्वैतकडून एक वचन घेणार आहे. या वचनामुळे कला आणि अद्वैत यांच्या आयुष्यात आता एक नवीन वादळ येणार आहे. दुसरीकडे, आईने नकार दिला तरी मी राहुलशीच लग्न करणार आणि लग्न करून त्याच घरात जाणार, हा स्वतःचा निर्णय नयना सगळ्यांना सांगून मोकळी झाली आहे. मालिकेच्या याच रंजक कथानकाने प्रेक्षकांना मालिकेशी बांधून ठेवले आहे. तर, ६.६चा टीआरपी मिळवत या मालिकेने टीआरपी शर्यतीत दुसरे स्थान पटकावले आहे.

क्राईम-थ्रिलर बघून कांटाळलात? पोट धरून हसायचंय? मग, बॉलिवूडचे ‘हे’ आयकॉनिक चित्रपट नक्कीच बघा!

प्रेमाची गोष्ट

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आठवडाभर अतिशय धमाकेदार कथानक पाहायला मिळत आहे. मुक्ता आणि सागर यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण होत असताना, आता कार्तिकने मुक्तावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या सगळ्याचा दोष मुक्तावर टाकून त्यांने मुक्ताला दोषी ठरवलं आहे. या सगळ्यात आपल्या बायकोचा काहीच दोष नसून, ती निर्दोष आहे हे सागरला सिद्ध करावे लागणार आहे. या सगळ्या कठीण प्रसंगात सागर मुक्ताची कशी साथ देणार, हे बघणं रंजक ठरणार आहे. या मालिकेने ६.३चा टीआरपी मिळवत आपलं तिसरं स्थान कायम ठेवलं आहे.

तुझेच मी गीत गात आहे

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत सध्या एकापाठोपाठ एक धक्के प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. आधी मंजुळा हीच वैदही असल्याचे समोर आले आहे. तर, आता मंजुळाच्या खून केल्याच्या आरोपाखाली वैदहीलाच अटक करण्यात आली आहे. मात्र, आपण आपल्या बहिणीचा खून केलेला नाही आणि आपण निर्दोष आहोत, हे सिद्ध करण्यासाठी आता वैदही अथक प्रयत्न करत आहे. या सगळ्यात मोनिका वैदहीला आपल्या आयुष्यातून कसं दूर करता येईल, याचा प्रयत्न करत आहे. या मालिकेने ६.१चा टीआरपी मिळवत चौथे स्थान पटकावले आहे.

कॉलेजच्या फोटोंमध्ये साक्षीला बघून अर्जुनला बसणार धक्का! ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार नवा खुलासा

सुख म्हणजे नक्की काय असतं

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत आता शालिनी पुन्हा एकदा जयदीप आणि गौरीच्या आयुष्यात परतून आली आहे. गौरी अर्थात नित्या हिला तिच्या मागचा जन्म आठवला आहे. यावेळी गौरी ही शालिनीला पुरून उरेल असाच विडा तिने उचलला आहे. या जन्मात तरी नित्या आणि अधिराज म्हणजेच गौरी आणि जयदीप यांची ही प्रेमकथा पूर्ण होईल का?, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. या मालिकेने ५.६चा टीआरपी मिळवत पाचवे स्थान पटकावले आहे.

IPL_Entry_Point