मराठी मालिकांचा या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या आठवड्यात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची वाहवाह मिळवत, टीआरपी शर्यतीतही बाजी मारली आहे. काही जुन्या मालिकांना मात देत नव्या मालिकांनी थेट टीआरपीच्या टॉप ५ यादीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर, काही मालिकांनी त्यातील धमाकेदार आणि रंजक वळणांमुळे पुढचं स्थान पटकावलं आहे. चला तर पाहूया, २०२४च्या १४व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट...
गेल्या काही महिन्यांपासून ‘ठरलं तर मग’ ही मालिका आपलं पहिलं स्थान टिकवून आहे. सध्या या मालिकेत अतिशय रोमँटिक वळण पाहायला मिळत आहे. सायली आणि अर्जुन यांच्यात आता प्रेमळ बंध निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. नवरा बायको म्हणून आता खऱ्या अर्थाने त्यांचा संसार सुरू होणार आहे. सायलीच्या प्रेमात पडलेला अर्जुन आता सायलीला आपल्या मनातील भावना सांगण्यात देखील यशस्वी होणार असून, सायली देखील आपलं प्रेम कबूल करणार आहे. लवकरच मालिकेत हे रंजक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेने चौदाव्या आठवड्यात देखील आपलं पहिलं स्थान टिकवून ठेवलं आहे.
कला आणि अद्वैत यांची कथा सांगणारी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरताना दिसत आहे. या मालिकेत आता कला आणि अद्वैत एका प्रकरणाचा मागोवा घेत असताना एकमेकांची मदत करताना दिसत आहेत. हळूहळू या दोघांमध्ये मैत्री देखील निर्माण होत आहे. या मैत्रीतील लुटूपुटूची भांडणं सगळ्यांनाच मनोरंजक वाटत आहे. टीआरपी शर्यतीत इतके दिवस तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर असणाऱ्या मालिकेने या आठवड्यात थेट दुसरे स्थान पटकावले आहे.
सागर आणि मुक्ताची कथा अर्थात ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या मालिकेने आपलं दुसरे स्थान टिकून ठेवले होते. मात्र, चौदाव्या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला टक्कर दिली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आता सागर मुक्ताचे मन जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दोघांमधील नातं आता हळूहळू बहरताना दिसणार आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत आता वैदहीला आपल्याच बहिणीच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाच्या तपासाला सामोरे जावे लागणार आहे. वैदेही आणि मंजुळा या जुळ्या बहिणी होत्या, हे सत्य आता समोर आले आहे. इतके दिवस वैदेही मंजुळा बनवून मल्हारच्या घरात राहत होती आणि आपल्या मुलीचा म्हणजेच स्वराचा सांभाळ करत होती. परंतु आता तिने आपणच वैदही असल्याचं सगळ्यांना सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिने आपण वैदेही असल्याचा सिद्ध देखील केलं आहे. मात्र, आता वैदहीनेच मंजुळाचा खून केला, असं म्हणत तिच्यावरच उलटपक्षी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैदेहीला आता ती स्वतः निर्दोष असल्याचे देखील सिद्ध करावे लागणार आहे. त्यात स्वरा तिची मदत करणार आहे. या मालिकेच्या रंजक कथानाकामुळे मालिकेने १४व्या आठवड्यात टीआरपी शर्यतीत चौथे स्थान पटकावले आहे.
नव्याने सुरू झालेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत सध्या ऐश्वर्या आणि सौमित्र यांच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. एकीकडे रणदिवे कुटुंब या लग्नासाठी आनंदात असताना, आता जानकी समोर एक वेगळंच सत्य आलं आहे. सौमित्रचं अवंतिका नावाच्या एका मुलीवर प्रेम होतं. मात्र, तरीही त्याने ऐश्वर्यासोबत लग्नाला होकार दिला आहे. आता अवंतिका जानकीकडे येऊन तिची मदत मागणार आहे. मी सौमित्र शिवाय जगू शकत नाही, असं म्हणत अवंतिका जानकीकडे विनवणी करणार आहे. मात्र, जानकी आता पुढे काय निर्णय घेणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या या मालिकेने टीआरपी शर्यतीतलं आपलं पाचवं स्थान टिकवून ठेवलं आहे.
संबंधित बातम्या