मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Mashal Geet : हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’! मशाल गीत लाँचिंगनंतर उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Mashal Geet : हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’! मशाल गीत लाँचिंगनंतर उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 16, 2024 02:38 PM IST

Thackeray Group Mashal Geet Launch : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (UddhavThackeray ) गटाकडून मशाल गीत (Mashal Geet) लाँच करण्यात आलं आहे. याप्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले की, ही मशाल हुकूमशाही भस्मसात करणार आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून मशाल गीत लाँच
उद्धव ठाकरे गटाकडून मशाल गीत लाँच

Thackeray Group Mashal Geet Launch : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करून उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका सुरू करण्यात आला आहे. अनेक पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. अनेक पक्षाकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (UddhavThackeray ) गटाकडून मशाल गीत (Mashal Geet) लाँच करण्यात आलं आहे. या गीताच्या लाँचिंग प्रसंगी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे म्हणाले, मशालीने ही हुकूमशाही भस्मसात करायची आहे.

आज (मंगळवार) ठाकरे गटाकडून प्रचारासाठी मशाल गीत लाँच करण्यात आले. मशाल गीताच्या लाँचिंगप्रसंगी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की,‘मशाल’ महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली आहे. या मशालीने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून विजयाची सुरूवात झाली आहे. हे चिन्ह घेऊन आता सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहोत. मशाल महाराष्ट्रात पोहोचली असून ही मशालच आता हुकूमशाहीला भस्मसात करणार आहे.

सांगली मतदारसंघातून विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीतील अपक्षांच्या उमेदवारीचाआम्हाला काही फटका बसणार नाही. हुकूमशाही संपवण्यासाठी जनमत तयार झालं आहे.लोक फक्त मतदानाची वाट बघत आहेत. जागावाटप जाहीर झालं आहे. आता जर बंडखोरी होत असेल,तरी त्या-त्या पक्षाने त्यात लक्ष घालून नाराजांची समजूत काढावी.

 

महाविकास आघाडीकडून जाहीरनामा कधी प्रकाशित होणार, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले मी पेपर फोडणार नाही. एक-एक टप्पा पार करत आम्ही पुढे जाणार आहोत. जाहिरातींचा कार्यक्रम आखत आहे. महाआघाडीकडून संयुक्त सभा व जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाईल. काँग्रेसने संपूर्ण देशातील जनतेसाठी जाहीरनामा केला आहे. त्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रासाठी काही महत्वाचे मुद्दे असतील तर ते आम्ही महाआघाडीच्या जाहीरनाम्यात सामील करू.

WhatsApp channel