Sangli Lok Sabha Constituency : सांगली लोकसभा मतदाससंघाचा पेच दिवसेंदिवस जटील होताना दिसत आहे. काँग्रेसचे नाराज नेते विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी र्ज भरल्यानंतर राज्याच्या राजकारणत खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.माझ्या उमेदवारीची इतकी अडचण होत असेल, तर मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार असल्याचं मोठं वक्तव्य ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil)यांनी केलं आहे. चंद्रहार पाटील सांगली लोकसभा मतदारसंघातून पहिल्यादांच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.
सांगलीत आज महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नितीन बानगुडे पाटील उपस्थित होते. यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको, हे काँग्रेसने मला उघडपणे सांगावे. मला माहिती आहे, माझ्याकडे कोणताही कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही, असंही ते म्हणाले आहेत.
चंद्रहार पाटील म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मुंबईला मातोश्रीवर गेलो होतो. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली. त्यानंतर मिरज येथे पार पडलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भरसभेत माझ्या उमेदवारीची घोषणा झाली. तिसऱ्यांदा पक्षाच्या वतीने अधिकृतपणे पत्राद्वारे माझ्या उमेदवारीची घोषणा झाली. चौथ्यांदा महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माझ्या उमेदवारीची घोषणा झाली.
माझ्या उमेदवारांची घोषणा चारवेळा होऊनही अजूनही आपले मित्रपक्ष आपल्यापासून लांब आहेत. त्यांचं नेमकं दुखणं काय, हे अजून आमच्या लक्षात आलेलं नाही. केवळ एक शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतोय, हे तुमचं दुखणं आहे?की,शिवसेना पक्षाची ताकद येथे कमी आहे,हे तुमचं दुखणं आहे?
चंद्रहार पाटील म्हणाले की, महाविकस आघाडी केवळ सांगलीपुरती नसून संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडी संपूर्ण देशात काम करत आहे. त्यामुळे नेमकं यांचं काय दुखणं आहे,हे माझ्या लक्षात आलं नाही.त्यांना माझी व माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे.
सांगली मतदारसंघासाठी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज घेतले होते. आज विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला आहे. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विशाल पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सांगलीत ठाकरे गटाच्या उमेदवारासमोर अडचणी वाढल्या आहेत.