Prakash Ambedkar post on X : महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा विचार सोडून स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करणारे व उमेदवारांची घोषणा करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता आघाडीच्या नेत्यांना लक्ष केलं आहे. याची सुरुवात आंबेडकर यांनी आज पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी एक फोटो शेअर करून सविस्तर पोस्ट केली आहे. त्यात एका व्यक्तीच्या प्रतिकृतीमागे खंजीर खुपसणारा हात दाखवण्यात आला आहे. खंजिरीवर संजय राऊत असं लिहिलं असून ज्याच्यावर हल्ला होतोय ती व्यक्ती 'वंचित' असल्याचं दाखवण्यात आलं आहे. सोबतच आंबेडकरांनी एक पोस्टही लिहिली आहे.
'संजय, किती खोटं बोलणार! तुमची आणि आमची मतं सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? 'फोर सीझन्स' हॉटेलमध्ये ६ मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावलं नाही? वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात? मित्रपक्ष असूनही तुम्ही पाठीवर वार केलेत,' असं आंबेडकर यांनी आपल्या सोशल पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘सिल्व्हर ओक येथील मीटिंगमध्ये तुम्ही काय भूमिका घेतली होती हे आम्हाला माहीत आहे! अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचं सुतोवाच तुम्ही केलं होतं हे खरं नाही का? हे कुठल्या प्रकारचं नातं तुम्ही आमच्याशी जोडत आहात? एकीकडं तुम्ही आघाडी करण्याच्या गोष्टी करता आणि दुसरीकडं आम्हाला पाडण्याची कारस्थानं रचता! हेच तुमचे विचार आहेत का?,’ असा सवाल आंबेडकर यांनी संजय राऊत यांना केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी तो अमान्य केला. आम्ही आणखी एक जागा सोडण्याची तयारी करत होतो. पण त्यांनी वेगळा निर्णय घेतला, असं राऊत म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची ही तिखट प्रतिक्रिया आली आहे.