नाशिकमध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा तिढा महायुतीने सोडवला. तसेच बारामतीमध्ये विजय शिवतारे, अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात आक्रकमक पवित्रा घेतला आहे. विजय शिवतारे यांची समजूत काढण्यात महायतीच्या नेत्यांना यश आले आहे. मात्र बुलढाण्यात थेट बंडखोरीच करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट लोकसभेसाठी अर्ज भरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच महायुतीत ही पहलीच बंडखोरी असल्याने अंतर्गत वादही उफाळण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान १२ खासदारांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा अथवा यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. शिंदेंना साथ देणाऱ्या १३ खासदारांपैकी १२ खासदारांना उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दोन दिवसात शिंदे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. मात्र त्यापूर्वीच बुलढाण्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अपक्ष अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
बुलढाणा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव विद्यमान खासदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याआधीच संजय गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने शिंदे गटातच सर्व आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
अर्ज भरल्यानंतर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी पहिल्यांदाच खासदारकीसाठी अर्ज भरला आहे. मला कोणाचाही आदेश नव्हता, पक्ष संघटनेच्या आग्रहाखातर मी अर्ज दाखल केला.