दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. अटकेनंतरही केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवत आहेत, त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टाने फेटाळून लावली आहे.
अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्याबाबात दाखल याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुरजित सिंह यादव नावाच्या व्यक्तीने ही जनहित याचिका दाखल केली आहे. मुख्य प्रभारी न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली.
या याचिकेत अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होत. मात्र या प्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असं मत न्यायालयानं नोंदवलं आहे.
दरम्यान गेल्या महिन्यात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीकडून अटक होण्यापूर्वी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्रीपदाची सूत्रे चंपाई सोरेन यांच्याकडे सोपवला. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही. ते तुरुंगातून दिल्लीचा कारभार करत आहेत.