Shirur Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या काही जागा जाहीर झाल्यामुळं आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघही यास अपवाद नाही. मात्र, आज या मतदारसंघातील दोन प्रमुख उमेदवार शिवनेरीवर एकत्र आले, तेव्हा एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं. सध्या या भेटीची राज्यभरात चर्चा आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे रिंगणात आहेत. तर, अजित पवारांच्या गटातून शिवाजीराव आढळराव पाटील हे पुन्हा एकदा नशीब आजमावणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला होता. त्यानंतरही आढळराव पाटील मतदारसंघात सक्रिय राहिले. आता पुन्हा एकदा ते मैदानात उतरणार आहेत.
अमोल कोल्हे यांचा मतदारसंघात संपर्कच नसल्याचा त्यांचा आरोप आहे. अमोल कोल्हे देखील त्यांना आपल्या परीनं उत्तर देत आहेत. अजित पवारांनी कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठीच त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात असलेल्या आढळराव पाटलांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी दिली आहे. त्यामुळं इथली लढत चुरशीची झाली आहे.
या सगळ्या राजकीय युद्धात कुठेही वैयक्तिक संघर्ष होऊ नये याची काळजी दोन्ही उमेदवार घेताना दिसत असल्याचं चित्र आज दिसून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज दोन्ही उमेदवार शिवनेरी किल्ल्यावर महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हे दोघेही समोरासमोर आले. आढळराव समोर येताच अमोल कोल्हे यांनी वाकून नमस्कार केला. आढळरावांनीही कोल्हे यांची पाठ थोपटली आणि हातात हात घेऊन काही वेळ बातचीत केली. त्यामुळं आनंदून गेलेल्या कार्यकर्त्यांनी लगेचच जय भवानी, जय शिवाजी… अशा घोषणा दिल्या. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिनेते असलेले अमोल कोल्हे हे २०१९ साली पहिल्यांदाच लोकसभेत निवडून गेले होते. मात्र इतर कलाकारांप्रमाणे ते केवळ नामधारी खासदार राहिले नाहीत. त्यांनी पाच वर्षांत लोकसभेत अनेक प्रश्न विचारले. विविध विषय मांडले. त्यांना संसदरत्न हा पुरस्कारही मिळाला. अजित पवार व विरोधक टोकाची टीका करत असतानाही कोल्हे हे त्यांना संयमानं उत्तर देत आहेत. त्यामुळं मतदारांमध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे. आजची त्यांची कृती त्यांच्या स्वभावाला साजेशीच असल्याचं बोललं जात आहे.