Govinda news : अभिनेते गोविंदा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढणार?
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Govinda news : अभिनेते गोविंदा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढणार?

Govinda news : अभिनेते गोविंदा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढणार?

Mar 28, 2024 05:55 PM IST

Govinda joins Eknath Shinde Faction : प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

अभिनेते गोविंदा आहुजा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढणार?
अभिनेते गोविंदा आहुजा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढणार?

Govinda joins Eknath Shinde Faction : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गोविंदा आहुजा यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांचं पक्षात स्वागत केलं. गोविंदा यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असताना गोविंदा यांनी याआधी २००४ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव करून ते 'जायंट किलर' ठरले होते. मात्र, खासदार म्हणून त्यांची कारकीर्द सुमार ठरली होती. संसदेकडं ते क्वचित फिरकले होते. त्यामुळं त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. परिणामी ते राजकारणापासून दूर गेले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी नवी इनिंग सुरू केली आहे.

गोविंदा यांनी तिकीट मागितलेलं नाही!

गोविंदा यांना मोदी सरकारचं आणि राज्यातील सरकारचं काम आवडलं. त्यातून प्रभावित होऊन गोविंदा हे आमच्यासोबत आले आहेत. ते कुठल्या अपेक्षेनं आलेले नाहीत. त्यांनी निवडणुकीचं तिकीट मागितलेलं नाही, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. गोविंदा हे लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक असतील, असंही शिंंदे यांनी स्पष्ट केलं.

रामराज्य आणणाऱ्या पक्षात आलोय!

मी आजच्या दिवशी पक्षात प्रवेश करणे हा दैवी संकेत आहे. २००४ ते २००९ राजकारणात सक्रिय होतो. बाहेर पडल्यानंतर असं वाटलं होतं पुन्हा या क्षेत्रात देणार नाही. मात्र, मधल्या १४ वर्षाच्या वनवासानंतर जिथं रामराज्य आहे, त्याच पक्षात आलोय. तुम्ही जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया गोविंदा यांनी पक्षप्रवेशानंतर दिली.

'विरारचा छोरा' अशी ओळख

गोविंदा हे अमराठी असले तरी त्याचं लहानपण विरारमध्ये गेलं आहे. त्यामुळं ते अस्खलित मराठी बोलतात. सर्व भाषिकांना ते आपले वाटतात. त्याच्या उमेदवारीला विरोध होण्याची शक्यता नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचीही भेट घेतली होती. त्यामुळं ते निवडणूक लढविण्याबाबत गंभीर असल्याचं बोललं जात होतं.

Whats_app_banner