मराठी बातम्या  /  निवडणुका  /  hyderabad lok sabha news : सानिया मिर्झा देणार ओवेसींना आव्हान, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता

hyderabad lok sabha news : सानिया मिर्झा देणार ओवेसींना आव्हान, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 28, 2024 04:16 PM IST

Sania Mirza may contest election : हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून तिच्या नावाचा विचार सुरू आहे.

सानिया मिर्झा देणार ओवेसींना टक्कर, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता
सानिया मिर्झा देणार ओवेसींना टक्कर, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता

Sania Mirza may contest election : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा ही राजकीय कोर्टवर उतरण्याची शक्यता आहे. ती हैदराबादमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. तसं झाल्यास सानियाची लढत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याशी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'मनी कंट्रोल'नं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीत काँग्रेसनं गोवा, दमण आणि दीव, तेलंगण, यूपी आणि झारखंडमधील १८ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केलं. याचेवळी हैदराबादच्या उमेदवारीसाठी सानिया मिर्झा हिच्या नावावर चर्चा झाल्याचं समजतं.

१९८० पासून काँग्रेस हैदराबादच्या राजकारणातून जवळपास बाद झाली आहे. १९८० साली केएस नारायण हे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले होते. त्यानंतर हैदराबामध्ये मोठ्या राजकीय यशापासून काँग्रेस लांबच राहिली आहे. तेलंगणची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसनं हैदराबादवर लक्ष केंद्रित केलं आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या शहरात पुन्हा एकदा राजकीय जम बसवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्याच दृष्टीनं काँग्रेस अत्यंत काळजीपूर्वक उमेदवारांची निवड करत आहे.

कोणी सुचवलं सानियाचं नाव?

आगामी लोकसभा निवडणुकीत सानिया मिर्झा हिच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांनी सानियाचं नाव सुचवल्याचं समजतं. अझरुद्दीन आणि सानियाचे कौटुंबिक संबंध आहेत. अझरुद्दीनचा मुलगा मोहम्मद असदुद्दीननं २०१९ मध्ये सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झासोबत विवाह केला आहे.

एमआयएमचा बालेकिल्ला भेदणार?

हैदराबाद हा गेल्या अनेक वर्षांपासून एआयएमआयएमचा बालेकिल्ला राहिला आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ओवेसींच्या पक्षाला कडवी टक्कर दिली. १९८४ मध्ये सुलतान सलाहुद्दीन ओवेसी अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. त्यानंतर त्यांनी १९८९ ते १९९९ पर्यंत हैदराबाद राखले. त्यानंतर २००४ पासून असदुद्दीन ओवेसी यांनी हा मतदारसंघ राखला. २०१९ मध्ये ओवेसी यांच्या विरोधात १४ उमेदवार निवडणूक लढले होते. मात्र, ओवेसी यांनी ५८.९४ टक्के मतं मिळवत ही जागा जिंकली. यावेळी भाजपनं माधवी लता यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे, तर बीआरएसनं गद्दम श्रीनिवास यादव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

सानियानं नुकताच ठोकलाय टेनिसला रामराम

सानिया मिर्झा ही याच वर्षी पाकिस्तानी क्रिकेटर पती शोएब मलिकपासून वेगळी झाली आहे. शोएब आणि सानियाला पाच वर्षांचा मुलगा आहे. सानिया आणि शोएबचं एप्रिल २०१० मध्ये हैदराबादमध्ये लग्न झालं आणि दोघंही दुबईत राहत होते. सानियानं गेल्या वर्षी टेनिसला रामराम ठोकला होता. तिच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत तिनं ४३ WTA दुहेरी आणि एक एकेरी विजेतेपद पटकावलं आहे.

WhatsApp channel