राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बच्चू कडू व स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध डावलून भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना संधी देण्यात आली आहे. भाजपने आज आपली सातवी उमेदवार यादी जाहीर केली. त्यामध्ये अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली. आता नवनीत राणा कमळ चिन्हावर अमरावतीतून निवडणूक लढणार आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र लोकसभा विजयानंतर त्यांनी भाजपला समर्थन दिले होते. त्यामुळे त्यांना अमरावतीतून भाजपची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. अखेर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून महायुतीतील घटकपक्ष शिवसेना, प्रहार संघटना त्याचबरोबर भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही विरोध दर्शवला होता. राणा यांना अमरावतीतून उमेदवारी दिल्यास महायुतीतून बाहेर पडून आपल्या संघटनेकडून उमेदवार देण्याचा इशाराही प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला होता. बच्चू कडू म्हणाले की, या मतदारसंघात आमच्या संघटनेला चांगले मताधिक्य आहे. येथे उमेदवार निश्चित करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे राज्यात जरी महायुती असली तर अमरावतीमध्ये आम्ही उमेदवार देणार आहे. त्याचबरोबर हा उमेदवार भाजपचाच असेल, असा गौप्यस्फोटही बच्चू कडू यांनी केला आहे.
त्याचबरोबर नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काल नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन राणांच्या उमेदवारीला विरोध केला होता. काहीही करा मात्र अमरावतीमधून राणा यांना उमेदवारी नको, असे गाऱ्हाणं मांडलं होतं. मात्र हा सर्व विरोध डावलून राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.