मुंबईत 'मातोश्री' बंगल्यात असलेल्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून आज उद्धव ठाकरे चांगलेच संतापले. ‘मातोश्रीतील बाळासाहेबांच्या खोलीबद्दल शिवसैनिक संवेदनशील आहेत. त्या खोलीला ‘कुठलीतरी खोली’ म्हणून हिणवणारे फडणवीस हे ‘नालायक माणूस’ आहे’ अशा कठोर शब्दात ठाकरे यांनी आज टीका केली. मुंबई (दक्षिण)चे उमेदवार, शिवसेना (ठाकरे गटा)चे अनिल देसाई यांच्या निवडणूक प्रचारासाठी आज, शनिवारी मुुंबईत अँटॉप हिल भागातील भरणी नाका परिसरात 'इंडिया' आघाडीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ठाकरे बोलत होते. या सभेत कॉंग्रेस आमदार भाई जगतापही उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन अर्थमंत्री व्हायचे होते. याची कबुली त्यांनी मला दिली होती, असा आणखी एक गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी या प्रचारसभेत केला. दरम्यान, शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असं आश्वासन तत्कालिन भाजप अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘मातोश्री’त बंगल्यात येऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झालेल्या बैठकीत दिलं होतं, याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी यावेळी केला.
महाराष्ट्राला मुंबई सहजासहजी मिळालेली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी झालेल्या गोळीबारात दोनशे ते अडीचशे हुतात्मे झाल्याचा वृत्तांत एका परदेशी पत्रकाराने लिहिलेला आहे. मुंबई हे देशाला सर्वाधिक कर देणारे शहर आहे. देशाच्या अर्थव्यव्यस्थेचा आधार आहे. गेलीअडीच वर्षे महापालिकेवर प्रशासक आहे. तुटीत असलेली मुंबई महापालिका शिवसेनेने सत्तेत असताना ९० हजार कोटी रुपयांची शिल्लक उभारली होती. परंतु सध्या राज्य सरकार कंत्राटदारांच्या माध्यमातून मुंबई महापालिकेची लूट करत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. अशीच लूट सुरू राहिली तर भविष्यात मुंबईची विकास कामे करण्यासाठी, अगदी सफाई कामगारांना पगार देण्यासाठी तिजोरीत पैसे शिल्लक राहणार नाही, असं ठाकरे म्हणाले. दरवेळी महापालिकेला भिकेचा कटोरा घेऊन केंद्राकडे जावे लागेल, असं ठाकरे म्हणाले.
शिंदे सरकारने मुंबई महापालिकेकडून तीन हजार कोटी रुपये काढून घेऊन मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ला दिले आहे. आम्ही सत्तेवर आल्यास एकतर एमएमआरडीएच रद्द करु किंवा कार्यकक्षा महापालिकेच्या बाहेरच्या बाहेर करू, अशी घोषणा यावेळी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टिकेला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.