आयपीएल २०२४ मध्ये युवा खेळाडूंची दादागिरी पाहायला मिळत आहे. सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा जवळपास प्रत्येक सामन्यात आपल्या संघाला झंझावाती सुरुवात देत आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सचा मधल्या फळीतील फलंदाज रियान परागने बॅटने आग लावली आहे.
तर सनरायझर्स हैदराबादसाठी नितीश कुमार रेड्डी कठीण काळात धावा करत आहेत.
युवा खेळाडूंच्या अशा कामगिरीनंतर असे मानले जात आहे की, या खेळाडूंना लवकरच टीम इंडियाकडून बोलावणे येऊ शकतो. अशा स्थितीत, आपण या खेळाडूंच्या या मोसमातील कामगिरीचा आढावा घेणार आहोत.
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने १० सामन्यात २०८.६१ च्या स्ट्राईक रेटने ३१५ धावा केल्या आहेत. विशेषत: अभिषेक शर्मा ज्या सहजतेने चेंडू सीमापार पाठवत आहे त्यामुळे अनुभवी खेळाडू प्रभावित झाले आहेत.
अभिषेक शर्माच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने ५७ सामन्यांमध्ये १५०.६९ च्या स्ट्राइक रेटने आणि २४.६३ च्या सरासरीने १२०७ धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाज म्हणून अभिषेक शर्माच्या नावावर ९ विकेट आहेत.
रियान पराग राजस्थान रॉयल्सकडून सातत्याने धावा करत आहे. या खेळाडूला आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीसही मिळाले. वास्तविक, रियान परागला टी-20 वर्ल्ड कपसाठी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले आहे. या मोसमात आतापर्यंत रियान परागने १० सामन्यांत ५८.४३ च्या सरासरीने ४०९ धावा केल्या आहेत.
त्याच वेळी, रियान परागच्या नावावर ६४ आयपीएल सामन्यांमध्ये १३६.१७ च्या स्ट्राइक रेट आणि २२.९३ च्या सरासरीने १००९ धावा आहेत. तसेच रियान परागने आयपीएल सामन्यांमध्ये ४ विकेट घेतल्या आहेत.
नितीश कुमार रेड्डी सनरायझर्स हैदराबादसाठी कठीण काळात धावा करत आहेत. या मोसमात आतापर्यंत नितीश कुमार रेड्डी याने ७ सामन्यात ५४.७५ च्या सरासरीने २१९ धावा केल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ४९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा १ धावाने पराभव केला.