मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH Vs RR Highlights : भुवनेश्वर कुमारने राजस्थानच्या जबड्यातून सामना हिसकावला, हैदराबादचा शेवटच्या चेंडूवर विजय

SRH Vs RR Highlights : भुवनेश्वर कुमारने राजस्थानच्या जबड्यातून सामना हिसकावला, हैदराबादचा शेवटच्या चेंडूवर विजय

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 02, 2024 11:41 PM IST

IPL 2024 SRH Vs RR Match Highlights : सनरायझर्स हैदराबादने रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा एका धावेने पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत सामन्याचा उत्साह कायम होता. भुवनेश्वरने शेवटच्या चेंडूवर विकेट घेत हैदराबादला विजय मिळवून दिला.

SRH Vs RR Highlights : भुवनेश्वर कुमारने राजस्थानच्या जबड्यातून सामना हिसकावला, हैदराबादचा शेवटच्या चेंडूवर विजय
SRH Vs RR Highlights : भुवनेश्वर कुमारने राजस्थानच्या जबड्यातून सामना हिसकावला, हैदराबादचा शेवटच्या चेंडूवर विजय (AP)

IPL 2024 SRH Vs RR Match Highlights : इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) मध्ये आज गुरुवारी (2 मे) एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) राजस्थान रॉयल्सचा (RR) एका धावेने पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात राजस्थानला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी २ धावांची गरज होती. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार शेवटचे षटक टाकत होता, तर रोव्हमन पॉवेल स्ट्राइकवर होता. भुवीने पॉवेलला यॉर्कर लेंथ चेंडू टाकला, यावर मोठा फटका खेळण्याच्या नादात पॉवेल एलबीडब्ल्यू आऊट झाला आणि संपूर्ण खेळच फिरला. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी १३ धावांची गरज होती.

या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना नितीश रेड्डीच्या नाबाद ७६ धावा आणि ट्रॅव्हिस हेडच्या ५८ धावांच्या जोरावर २० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात २०१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, खराब सुरुवातीपासून सावरलेल्या राजस्थानला रियान परागच्या ७७ धावा आणि यशस्वी जैस्वालच्या ६७ धावांच्या जोरावर २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात २०० धावाच करता आल्या.

हैदराबादच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने एका धावेवर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसनची विकेट गमावली. 

पण यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांच्यातील १३३ धावांच्या भागीदारीने राजस्थानला विजयाच्या जवळ आणले होते, पण तरीही संघ विजयाची नोंद करू शकला नाही.

यशस्वी जैस्वालने ४०0 चेंडूत ६७ धावा केल्या, ज्यात त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. रियान परागने ४९ चेंडूत ७७ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यात त्याने ८ चौकार आणि ४ षटकार ठोकले.

लवकर २ विकेट पडल्यानंतरही, राजस्थान रॉयल्सने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये २ गडी गमावून ६० धावा केल्या होत्या. जैस्वाल आणि रियान पराग ही जोडी गोलंदाजांची धुलाई कर होती. 

पण या दरम्यान, १४व्या षटकात टी नटराजनच्या चेंडूवर ६७ धावा काढून जैस्वाल बाद झाला. पण पराग अजूनही क्रीजवर उभा होता. राजस्थानची धावसंख्या १५ षटकांत १५७ धावा होती आणि संघाला शेवटच्या ५ षटकांत ४५ धावांची गरज होती. १६व्या षटकात रियान परागही बाद झाला, त्यामुळे सामना फसला. 

यानंतर राजस्थानला शेवटच्या २ षटकात २० धावा हव्या होत्या आणि अजून ५ विकेट शिल्लक होत्या. पण पॅट कमिन्सने टाकलेल्या १९व्या षटकात केवळ ७ धावा आल्या.

शेवटी हैदराबादला शेवटच्या ६ चेंडूत १३ धावा करायच्या होत्या. शेवटचे षटकात भुवनेश्वर कुमारने शानदार टाकले. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती. पण भुवीने रोव्हमन पॉवेलची विकेट काढत सामना हैदराबादला जिंकून दिला.

हैदराबादची शानदार गोलंदाजी

भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात जोस बटलर आणि संजू सॅमसनचे विकेट घेत एसआरएचच्या हैदराबादला दमदार सुरुवात केली. भुवनेश्वर कुमारने ३ तर पॅट कमिन्स आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. मार्को यान्सनने एकही विकेट न घेता ४४ धावा दिल्या आणि जयदेव उनाडकटने २ षटकात २३ धावा दिल्या. १९व्या आणि २०व्या षटकात पॅट कमिन्स आणि भुवनेश्वर कुमार यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीने हैदराबादला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

हैदराबादचा डाव

हैदराबादकडून नितीश रेड्डीने ४२ चेंडूंत ३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा केल्या तर ट्रॅव्हिस हेडने ४४ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या.

हैदराबादने ३५ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि नितीश रेड्डी यांनी ५७ चेंडूत ९६ धावांची भागीदारी केली.

शेवटी हेनरिक क्लासेनने १९ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून वेगवान गोलंदाज आवेश खानने २ बळी घेतले.

IPL_Entry_Point