IPL 2024 : स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेला पंजाब किंग्स शेवटचा सामना जिंकणार? आज राजस्थानशी लढत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेला पंजाब किंग्स शेवटचा सामना जिंकणार? आज राजस्थानशी लढत

IPL 2024 : स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेला पंजाब किंग्स शेवटचा सामना जिंकणार? आज राजस्थानशी लढत

May 15, 2024 05:06 PM IST

IPL 2024, PBKS vs RR : आयपीएल स्पर्धेतील ६५ वा सामना आज पंजाब किंग्स व राजस्थान रॉयल्समध्ये होत आहे. दोन्ही संघ विजयासाठी निकराचा प्रयत्न करताना दिसतील.

RR vs PBKS: Fantasy XI, Venue Details, Pitch Report
RR vs PBKS: Fantasy XI, Venue Details, Pitch Report (IPL-X)

IPL 2024, PBKS vs RR : आयपीएल स्पर्धा कमालीची रंगात आली असून आज साखळी फेरीतील ६५ वा सामना होत आहे. स्पर्धेतून बाहेर फेकला गेलेला पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात हा सामना होत आहे. शेवटचा सामना जिंकून सन्मानानं बाहेर पडण्याचा पंजाबचा आज प्रयत्न असेल, तर पंजाबला मात देऊन गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये टिकून राहण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल.

गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. राजस्थानचा संघ आपला स्फोटक फलंदाज जोस बटलरच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणार आहे. पंजाबचं नेतृत्व सॅम करन याच्याकडं असेल.

सामना फिरवू शकणारे खेळाडू

संजू सॅमसन

आरआरचा कर्णधार संजू सॅमसन यंदाच्या मोसमात आतापर्यंतचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या यष्टीरक्षक फलंदाजानं १२ सामन्यांत ६०.७५ च्या सरासरीनं आणि १५८.३१ च्या स्ट्राईक रेटनं ४८६ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ५ अर्धशतकं आहेत. सॅमसननं यंदाच्या मोसमात सर्वाधिक ८६ धावा केल्या आहेत.

युजवेंद्र चहल

राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल विकेट घेण्याच्या यादीत अव्वल स्थानी आहे. चहलनं या मोसमात १२ सामन्यांत १५ बळी घेतले असून त्याची सर्वोत्तम कामगिरी ३/११ अशी आहे.

रियान पराग

डावखुरा फलंदाज रियान पराग यंदाच्या मोसमात दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तो जबरदस्त फॉर्मात आहे. परागनं ११ डावात १५३.८२ च्या स्ट्राईक रेटनं ४८३ धावा केल्या आहेत. या तरुण खेळाडूनं आपल्या संघासाठी ४ अर्धशतकं झळकावली आहेत.

यशस्वी जयस्वाल

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं यंदाच्या मोसमात संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या या युवा खेळाडूवर पीबीकेएसविरुद्ध बरीच जबाबदारी असेल. जयस्वालनं १२ सामन्यांत १५३.५७ च्या स्ट्राईक रेटनं ३४४ धावा केल्या असून त्यात एक अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे.

पंजाब किंग्ससाठी हे खेळाडू ठरू शकतात गेमचेंजर

शशांक सिंग

सलामीवीर अपयशी ठरत असताना शशांक सिंगनं पीबीकेएससाठी फलंदाजीची बाजू सांभाळली आहे. त्यानं १२ सामन्यात ५८.६७ च्या सरासरीनं आणि १६८.४२ च्या स्ट्राईक रेटनं ३५२ धावा केल्या आहेत.

अर्शदीप सिंग

अर्शदीप सिंग पीबीकेएसच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. अर्शदीपनं १२ सामन्यांत १६ बळी घेतले असून एका सामन्यात सर्वाधिक चार विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

सॅम करन

पीबीकेएसचा कर्णधार आणि अष्टपैलू सॅम करननं आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. पंजाबचा संघ बाहेर फेकला गेल्यानं शेवटचा सामना जिंकून स्पर्धेला सन्मानानं निरोप देण्याचा करनचा प्रयत्न असेल. करननं १२ सामन्यांत २०७ धावा करत १४ बळी घेतले आहेत.

हर्षल पटेल

हर्षल पटेलनं यंदाच्या मोसमात पंजाबकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यानं १२ सामन्यांत ९.७६ च्या सरासरीनं २० बळी घेतले आहेत.

कोणता संघ सरस?

आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ २७ वेळा आमनेसामने आले आहेत. राजस्थान रॉयल्सनं 16 विजयांसह वर्चस्व राखलं आहे. या मोसमाच्या सुरुवातीला पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या लढतीतही राजस्थाननं विजय मिळवला होता.

कशी आहे खेळपट्टी?

बारसापारा क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी टी-२० सामन्यांसाठी फलंदाजीचं नंदनवन आहे. इथं खेळणारे संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतात. गेल्या मोसमात या मैदानावर झालेले दोन्ही सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले होते. या मैदानावर आज मोसमातील पहिला सामना होत आहे. आरआरचे हे दुसरे होमग्राउंड असल्यानं हा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.

कसा होईल सामना?

दोन्ही संघांना आपल्या शेवटच्या लढतीत सलग पराभव पत्करावा लागल्यानं आज दोन्ही बाजूंकडून विजयासाठी प्रयत्न होईल. पंजाब सन्मानानं बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल, तर राजस्थान रॉयल्स आज विजय मिळवून गुणतालिकेतील स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करेल. गुगल विन प्रीडिक्टरनुसार, आरआरची विजयाची शक्यता ५७ टक्के आहे.

ड्रीम इलेव्ह

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिली रोसू, रियान पराग, शशांक सिंग, सॅम करन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग (उपकर्णधार)

Whats_app_banner

संबंधित बातम्या