मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Pravin Amre : ही आयपीएल आहे, परफॉर्म करा नाहीतर… पृथ्वी शॉला बाहेर बसवल्याच्या चर्चेवर प्रवीण आमरे परखड बोलले!

Pravin Amre : ही आयपीएल आहे, परफॉर्म करा नाहीतर… पृथ्वी शॉला बाहेर बसवल्याच्या चर्चेवर प्रवीण आमरे परखड बोलले!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 15, 2024 02:32 PM IST

Pravin Amre on Prithvi Shaw : आयपीएलच्या साखळी फेरीतील दिल्ली कॅपिटल्सच्या शेवटच्या दोन सामन्यांत पृथ्वी शॉ याला बाहेर बसवल्यामुळं सुरू असलेल्या चर्चेवर प्रवीण आमरे यांनी परखड भाष्य केलं आहे.

ही आयपीएल आहे, खेळ दाखवा नाहीतर… पृथ्वी शॉला बाहेर बसवल्याच्या चर्चेवर प्रवीण आमरे काय म्हणाले?
ही आयपीएल आहे, खेळ दाखवा नाहीतर… पृथ्वी शॉला बाहेर बसवल्याच्या चर्चेवर प्रवीण आमरे काय म्हणाले?

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या साखळी फेरीतील शेवटच्या दोन्ही सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वी शॉला वगळलं होतं. त्यावरून सुरू असलेल्या चर्चेवर संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी भाष्य केलं आहे. 'ही आयपीएल आहे. तुमची कामगिरी चांगली नसेल तर तुम्ही टिकू शकत नाही, असं आमरे यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्ली कॅपिटल्स चालू सीझनमध्ये पृथ्वी शॉला स्वत:कडं ठेवलं आहे. मात्र, पहिल्या दोन सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतरच्या दोन सामन्यात त्यानं चांगली खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध २७ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. तर, पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध ६६ धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र त्याचा सूर हरवला. तो चाचपडू लागला.

पृथ्वी शॉ चाचपडत असताना दुसरीकडं अभिषेक पोरेल हा फॉर्मात होता. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत त्यानं १२ डावांत १५९.५१ च्या स्ट्राईक रेटनं ३२७ धावा केल्या. मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध डीसीच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात पोरेलनं चमकदार कामगिरी केली. दिल्ली कॅपिटल्सनं या सामन्यात १९ धावांनी विजय मिळवला.

पोरेलनं या सामन्यात ३३ चेंडूत ५८ धावांची खेळी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना चकित केलं. पॉवरप्लेमध्ये त्यानं जोरदार फटकेबाजी केली, त्यामुळं संघाला ७३ धावा जमवता आल्या. त्यानं दुसऱ्या विकेटसाठी शाई होपसोबत ९२ धावांची भागीदारी केली.

प्रवीण आमरे म्हणतात…

पृथ्वी शॉला आम्ही संघात कायम ठेवले होते. मात्र, तब्बल चार सामन्यांमध्ये तो बाहेर होता. शेवटी हे आयपीएल आहे. तुम्ही फॉर्ममध्ये नसाल तर तुम्ही जागा राखू शकत नाही. शेवटी संघावर दडपण इतकं असतं की प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो आणि आम्हाला जिंकावं लागतं,' असं आमरे 'ईएसपीएन क्रिकइन्फोशी' बोलताना म्हणाले.

मला वाटतं आमचा निर्णय योग्य होता. पृथ्वी शॉला न खेळता आम्ही सामने जिंकले. इतकंच नाही, ज्या खेळाडूला संधी दिली, त्यानं संधीचं सोनं केलं. अभिषेकनं संधीचा पुरेपूर फायदा घेतला, असं आमरे म्हणाले.

पृथ्वी शॉची कामगिरी कशी आहे?

पृथ्वी शॉनं चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून एकूण आठ सामने खेळले. या आठ सामन्यांत त्यानं २४.७५ च्या सरासरीनं आणि १६३.६४ च्या स्ट्राईक रेटनं १९८ धावा केल्या आहेत. आठ सामन्यात त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आलं आहे.

IPL_Entry_Point