Team India Head Coach : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. आगामी टी-20 वर्ल्डकप हा अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
अशा स्थितीत टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला आहे. एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार, न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांना भारताचे नवे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. फ्लेमिंग आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या पदासाठी कधी अर्ज करतात? याची बीसीसीआयचे अधिकारी वाट पाहत आहेत.
बीसीसीआयच्या अटींनुसार नवीन प्रशिक्षकाला तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
BCCI ने भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज घेणे सुरू केले असून २०२४ च्या T20 विश्वचषकानंतर नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाऊ शकते. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मे ठेवण्यात आली आहे.
स्टीफन फ्लेमिंग २००९ पासून चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली सीएसेकेन ५ आयपीएल जेतेपदं पटकावली आहेत.
स्टीफन फ्लेमिंग टीम इंडियाचे हेड कोच झाले तर येत्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटची स्थिती बदलण्याची शक्यता आहे. फ्लेमिंगकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्ये आहेत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करून आपल्या खेळाडूंमधून सर्वोत्तम कसे मिळवायचे? हे त्यांना माहीत आहे.
टीम इंडियाचा जो कोणी नवीन प्रशिक्षक असेल, त्यांचा कार्यकाळ १ जुलैपासून सुरू होईल आणि ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत चालेल. याचा अर्थ नवीन प्रशिक्षक २०२७ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकापर्यंत भारतीय संघाची जबाबदारी सांभाळतील.
एका मीडिया रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, मुख्य प्रशिक्षकाव्यतिरिक्त सपोर्टिंग स्टाफमध्ये १४-१६ लोकांना ठेवले जाऊ शकते.