Uddhav Thackeray attacks Devendra Fadnavis : ‘मी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करेन आणि स्वत: दिल्लीच्या राजकारणात जाईन, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र, नंतर भाजपवाल्यांनी मलाच माझ्या लोकांसमोर खोटं पाडलं,’ असा गौप्यस्फोट शिवसेनेचे (Shiv Sena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. शिवसेना आणि भाजपची युती तुटण्यास कारणीभूत असलेल्या सत्तावाटपाच्या सूत्रावरही त्यांनी भाष्य केलं.
'शिवसेना-भाजपमध्ये उत्तम चाललं होतं. भाजपनं देश सांभाळावं, आम्ही महाराष्ट्र सांभाळू अशी सरळ विभागणी होती. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर, खासकरून अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर भाजप बदलला. त्यांना वाटलं आता आपण शिवसेनेला नामोहरम करू. पण मी ते होऊ दिलं नाही. वापरा आणि फेकून द्या ही त्यांची नीती आहे. २०१९ मध्ये त्यांनी नेमकं हेच केलं, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
'शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द मी बाळासाहेबांना दिला होता. अमित शहा यांच्या भेटीत मी तसं सांगितलं आणि त्यानंतरच अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मुला ठरला होता. फडणवीस तर तेव्हा दिल्लीच्या राजकारणात जाण्यासाठी तयार झाले होते. त्यांनी मला तसं सांगितलं होतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
काँग्रेसमध्ये आलेली मरगळ आता झटकली गेली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत लोक बोलायला घाबरत होते. आता लोक बिनधास्त बोलू लागले आहेत. लोकशाहीच धोक्यात आहे हे आता लोकांना कळलंय. मी आणि राहुल गांधी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा लोकांना वाटतं, कोणीतरी आपल्यासाठी उभं राहणारं आहे. त्यांच्यातही खोट्या आश्वासनांविरुद्ध बोलण्याचं धाडस येतं, भाजपला हरवू शकतो असं आता लोकांना वाटू लागलंय,' असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
हिंदुत्व आम्ही कधीही सोडलेलं नाही. पण भाजपचं हिंदुत्व आणि आमच्या हिंदुत्वात फरक आहे. आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे आणि भाजपचं घरं जाळणारं आहे. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात कधीच नव्हतो. आम्ही केवळ देशद्रोह्यांच्या विरोधात आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेच्या भूमिकेत अजिबात बदल झालेला नाही. बाळासाहेबांच्याबद्दल लोकांच्या मनात काही प्रमाणात गैरसमज होता. अनेक वर्षांनंतर आता हा गैरसमज दूर होतोय. १९९२-९३ मध्ये बेहरामपाड्यात हिंसाचार सुरू झाला होता. आता तिथं शिवसेनेचा नगरसेवक आहे, याकडं उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधलं.