Lok Sabha Election 2024: देशात आजपासून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. देशात आज १९ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील १०२ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. बहुंताश उमेदवारांनी अर्ज भरला आहे. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा दावा केला जात आहे.
या व्हायरल व्हिडिओनंतर शाहरुख खान स्वत: प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात आल होता का? असा प्रश्न अनेकांना पडला. परंतु, व्हायरल व्हिडिओमागील सत्य तपासले असता एक वेगळीच माहिती समोर आली. प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्यासाठी सोलापुरात आलेल्या व्यक्ती शाहरूख खानचा डुप्लिकेट असल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये डुप्लिकेट शाहरुख ब्लॅक टी-शर्ट आणि जीन्स लूकमध्ये दिसत आहे. त्याची हेअरस्टाईल, लूक, हावभाव सगळेच शाहरुखसारखे आहेत. अशा परिस्थितीत शाहरुख खरोखरच प्रणिती शिंदेच्या प्रमोशनसाठी आला आहे की काय? अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली. सोलापुरात प्रचारासाठी आलेल्या या डुप्लिकेट शाहरुखला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली.
प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असून २००३ ते २००४ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्या सोलापूर शहर मध्यच्या विद्यमान आमदार असून त्यांना काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. सोलापुरात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. २०१९ मध्ये सुशील शिंदे यांचा सोलापूरमतदारसंघातून भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडून पराभव झाला. यावेळी भाजपने सुशील शिंदे यांच्या मुलीच्या विरोधात राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. राम हे माळशिरस मतदारसंघातून महाराष्ट्राचे विद्यमान आमदार आहेत.
सोलापूर हे औद्योगिक क्षेत्र असून ते कापूस गिरण्या आणि यंत्रमागासाठी ओळखले जाते. महाराष्ट्रातील सोलापूर हे सीना नदीच्या काठावर वसलेले आहे. या ठिकाणी एकेकाळी चालुक्य आणि देवगिरी यादवांचे राज्य होते. पुढे सोलापूर बहमनी आणि विजापूर साम्राज्याचा भाग बनले. मुस्लिम शासकांनी बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष आजही येथे आहेत. २०१४ पासून ही जागा भाजपकडे आहे.
संबंधित बातम्या