मराठी बातम्या  /  निवडणुका  /  chhagan bhujbal : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून छगन भुजबळ यांची माघार, अचानक असं काय घडलं?

chhagan bhujbal : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून छगन भुजबळ यांची माघार, अचानक असं काय घडलं?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 19, 2024 04:23 PM IST

Chhagan Bhujbal on Lok Sabha Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला आहे.

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून छगन भुजबळ यांची माघार, अचानक असं काय घडलं?
नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून छगन भुजबळ यांची माघार, अचानक असं काय घडलं?

Nashik Lok Sabha Constituency : महायुतीमध्ये वादाचा विषय ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. त्यामुळं आता ही जागा शिंदेंची शिवसेना लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. इथं नेमका कोण उमेदवार असेल याविषयी आता उत्सुकता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू झालं तरी महायुतीचं राज्यातील जागावाटप रखडलं आहे. ठाणे, दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, पालघर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जागा नेमक्या कोणाला जाणार याविषयी संभ्रम कायम आहे.

नाशिकमध्ये शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी एका सभेत हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं या जागेवर दावा केला. छगन भुजबळ यांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा सुरू होती. दुसरीकडं, भाजपनं या जागेवर दावा केला होता. त्यामुळं तिढा आणखीच वाढला. महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर करून प्रचार सुरू केल्यानंतरही महायुतीचा उमेदवार जाहीर होत नव्हता. या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीत माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

काय म्हणाले छगन भुजबळ?

'होळीच्या दिवशी आम्ही काही जण देवगिरीवर अजित पवारांकडं गेलो. तिथं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे होते. त्यावेळी अजित पवारांनी दिल्लीत अमित शहा यांच्याशी लोकसभेच्या जागांविषयी झालेल्या चर्चेची माहिती दिली. नाशिक लोकसभेची चर्चा झाली, तेव्हा अजितदादांनी दावा केला आणि समीर भुजबळ यांचं नाव सांगितलं. त्यावेळी अमित शहा यांनी स्वत: माझं नाव सुचवलं. त्याचवेळी, हेमंत गोडसे हे तिथं विद्यमान खासदार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी शहांच्या निदर्शनास आणलं. त्यावर, आम्ही त्यांना समजावू असं शहा म्हणाले.

या सगळ्या चर्चेनंतर आम्ही अजित पवारांकडून वेळ घेतला. अमित शहा यांच्याकडून आग्रह असल्यानं मतदारसंघाचा आढावा घेतला. मी लोकांशी भेटलो. मराठा समाजासह सर्वच समाजातील लोक मला भेटले. मला पाठिंबा व्यक्त केला. वेगवेगळ्या पक्षांतीलही लोक होते. उत्तम प्रतिसाद दिसला. त्यानंतर बातमी फुटली आणि चर्चा सुरू झाली. आम्ही तयारीही सुरू केली. पण उमेदवारी जाहीर होण्यास उशीर होत गेला. त्यातून तिढा वाढत गेला. आता तीन आठवडे उलटल्यानंतरही उमेदवार जाहीर झालेला नाही. आणखी वेळ लागला तर जागेचं नुकसान होऊ शकतं. हा डेडलॉक संपवण्याचं मी ठरवलं आहे. महायुतीचं नुकसान होऊ नये म्हणून मी माघार घेतो आहे, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

भाजपच्या नेत्यांचे मानले आभार

'संभ्रम दूर करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली आहे. मी राज्यभरात प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी मला बोलावलं जात आहे. महायुतीची शक्ती वाढवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करणार आहे. मोदी साहेबांनी दाखवलेला विश्वास आणि मला पाठिंबा देणाऱ्यांचे मी आभार मानतो, असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

हेमंत गोडसे की अजय बोरस्ते?

छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर आता ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार की भाजप इथून आपला उमेदवार देणार याविषयी उत्सुकता आहे. हेमंत गोडसे यांच्या व्यतिरिक्त इथं अजय बोरस्ते यांचंही नाव समोर आलं आहे. त्यामुळं उमेदवारीची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहावं लागणार आहे.

WhatsApp channel