Mahua Moitra Viral Video : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत असताना प्रचाराला जोर चढला आहे. प्रचाराच्या या धामधुमीत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे किंवा व्हायरल होत आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांचा एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात महुआ या आपल्या एनर्जीचं रहस्य सेक्स असल्याचं बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओवरून मोठा गदारोळ झाल्यानंतर महुआ यांनी स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'कॅश फॉर क्वेंश्चन' प्रकरणात ठपका ठेवून लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या महुआ मोइत्रा पश्चिम बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून तृणमूलच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या उमेदवार राजमाता अमृता राव यांच्याशी त्यांची थेट लढत होत आहे. प्रचाराच्या काळात महुआ यांनी दिलेल्या एका मुलाखतीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांना तुमच्या उर्जेचा स्रोत काय आहे? असं प्रश्न विचारला गेला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार महुआ मोइत्रा यांनी आपल्या एनर्जीचं रहस्य 'सेक्स' असं सांगितलं आहे. हा व्हिडिओ शेअर करताना एक कॅप्शनही लिहिण्यात आलं आहे. त्यात महुआ यांचं नाव केरळमधील एका नेत्याशी जोडण्यात आलं आहे. यावेळी दोघांचाही पराभव होणार आहे. त्यामुळं ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडं भरपूर वेळ असेल, असं त्या व्हिडिओ कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. काही युजर्सनी हे सगळं खोटं असल्याचं म्हटलं आहे. महुआ मोइत्रा असं काहीच म्हटलेल्या नाहीत. त्यांनी 'एग्ज' हा शब्द उच्चारला आहे, सेक्स नाही. त्यामुळं कुणीही निरर्थक अफवा पसरवू नये, असं एका युजरनं म्हटलं आहे.
महुआ मोईत्रा यांची मुलाखत घेणाऱ्या पत्रकारानं या व्हिडिओबद्दल व त्यातीत दाव्यांबद्दल खुलासा केला आहे. तमल साह असं त्या पत्रकाराचं नाव आहे. तमल म्हणतो, ‘मी घेतलेल्या मुलाखतीवरून जो काही गदारोळ सुरू आहे, त्यावर मला बोलणं गरजेचं आहे. मी महुआ मोईत्रा यांना विचारलं, सकाळी तुझ्या ऊर्जेचा स्रोत काय अकतो? त्यावर महुआ यांनी EGGS असं उत्तर दिलं. काही भक्त मंडळी शब्दांची मोडतोड करून अर्थाचा अनर्थ करत आहेत हे लाज आणणारं आहे. ‘एग्ज’चा उच्चार ‘सेक्स’ वाटावा अशा पद्धतीनं हा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. हेतूपरस्पर हे करण्यात आलं आहे, असं तमल साहानं म्हटलं आहे.