Uddhav thackeray in palghar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेकमधील सभेत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमधील सभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा केला होता. या टीकेवर उद्धव ठाकरेंनी पालघरमधील जाहीर सभेतून जोरदार पलटवार केला आहे. गद्दारांचे मालक महाराष्ट्रात फिरत आहेत, कोण गद्दार आणि कोण मालक सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेला नकली म्हणता. नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?, असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदींना लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नरेंद्र मोदींवर टीका करत आहे. देशाच्या पंतप्रधानांवर नाही. कारण मी देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करू इच्छित नाही. एकतर तुमचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेला नकली म्हणता. नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? मग त्यांचे दुसरे पार्टनर व खंडणीबहाद्दर महाराष्ट्रात आले आणि ते सुद्धा नकली म्हणाले. हा भाडXX जनता पक्ष आहे. ईडी, सीबीआय आणि इनकम टॅक्सची बंदूक लाऊन गद्दारांना घेऊन गेले.
बाळासाहेब ठाकरेंनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन केली होती, ती शिवसेना तुम्ही संपवायला निघाला आहात. मात्र, आज तुमच्यासोबत कोण आहे? अमित शहांच्या गाडीत मूळचे भाजपवाले किती? आणि स्टेपण्या किती आत आहेत ते बघा.
तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह पळवून नेलं, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही शिवसेना व उद्धव ठाकरेंना संपवायला निघालात. ही तुमची वृत्ती. मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून पालघरमध्ये येऊन प्रचार केला. ती आम्ही चूक केली. तेच आता नकली सेना म्हणून आमची टिंगल करताहेत.
तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेला संपवलं. तर प्रत्येक सभेत उद्धव ठाकरेंचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का होत नाही. चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. तुम्हाला निवडून दिलं होतं देशाचे शत्रू चीन-पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी. तिकडे शेपट्या घालता अन् इकडं येऊन फणा काढता, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, पालघर पर्यटनासाठी उत्तम जिल्हा आहे. याचा विकास झाला पाहिजे, पालघरमध्ये मला वाढवण बंदर नको पण पालघरमध्ये मला एअरपोर्ट आणायचं होतं. सगळे चांगले उद्योगधंदे गुजरातला आणि इकडे वाढवण बंदर करायचं, तिकडे बारसूमध्ये रिफायनरी मीच रद्द केली होती आणि त्या जनतेचा विरोध असेल तर होणार नाही हे सुद्धा सांगतिलं होतं. विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्रत अन् उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहेत. मोदीजी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.