गेल्या वर्षी श्रावण महिन्यात लालूप्रसाद यादव यांना भेटायला गेलेल असताना लालू यादव यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या पसंतीची चंपारण मटन करून खाऊ घातले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निवडणूक प्रचार सभेत याचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही नेत्यांचे नाव न घेता त्यांची तुलना मुघलांशी केली आहे. श्रावण महिना सुरू असताना मटन खाऊन या दोघेाही नेत्यांनी देशातील जनतेला चिडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मोदी यांनी काश्मीरमधील उधमपूर येथे आयोजित निवडणूक प्रचार सभेत केला आहे.
मोदी म्हणाले, ‘काँग्रेस आणि त्यांच्यासोबत युती केलेल्या राजकीय नेत्यांना देशातील बहुसंख्य जनतेच्या भावनांची पर्वा नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते. ज्या व्यक्तीला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे आणि जो जामिनावर बाहेर आहे, तो श्रावण महिन्यात अशा गुन्हेगाराच्या घरी जाऊन मटन शिजवण्याचा आनंद घेतो. देशातील लोकांना चिडवण्यासाठी रेसिपीचा व्हिडिओ बनवतो’ असं पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे एका प्रचार सभेत सांगितले.
दरम्यान,'देशातला कायदा कुणालाही काहीही खाण्यापासून रोखत नाही. पण या लोकांचा हेतू काही औरच आहे. जेव्हा मुघलांनी येथे आक्रमण केले, तेव्हा मंदिरे पाडल्याशिवाय त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे मोगलांप्रमाणेच त्यांनाही श्रावण महिन्यात व्हिडिओ दाखवून देशातील जनतेला चिडवायचे होते.' असं मोदी म्हणाले. राजद नेते, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या वादावरही पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘नवरात्रीदरम्यान मांसाहारी पदार्थ खाऊन, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून हे राजकीय नेते लोकांच्या भावना दुखावत आहेत. ते कुणाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत?’ असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिकेवर राजद नेते तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मासळी खातानाचा व्हिडिओ ८ एप्रिल रोजी बनवण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी नवरात्र सुरू झाली होती.' अशी प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी व्यक्त केली आहे.
तेजस्वी यादव हे बेरोजगारीच्या मुद्यावर सर्वात जास्त बोलत आहेत. तुम्ही दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन देऊन २०१४ साली सत्तेवर आला होता. या मुद्दावर तुम्ही गप्प राहता. सर्वांना उत्तम आरोग्याच्या सुविधांबाबत तुम्ही काही बोलत नाही. लोकांचे लक्ष विचलित करण्याची हे तंत्र आता चालणार नाही. तुम्ही राष्ट्रीय पातळीचे नेते आहात. तेजस्वी यादवसारख्या राज्य पातळीवरील नेत्यावर कशाला टिका करता?, असा सवाल राजदचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी केला आहे.
संबंधित बातम्या