Tushar Gandhi on Vanchit Bahujan Aghadi : ‘प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला लोकसभा निवडणुकीत मतदान करू नका,’ असं आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी जनतेला केलं आहे.
ते पत्रकारांशी बोलत होते. देशात राष्ट्रीय पातळीवर सध्या इंडिया विरुद्ध एनडीए अशी लढत होत आहे, तर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं वेगळी चूल मांडल्यानं पुरोगामी विचारांच्या पक्षांना काही प्रमाणात फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तुषार गांधी यांनी मतदारांना आवाहन केलं आहे.
'भाजपनं फोडलेली शिवसेना आणि फोडलेली राष्ट्रवादी मिळून जी युती झाली आहे, तिचं नाव खरंतर गद्दारांची युती असायला पाहिजे. त्या गद्दारांच्या युतीला हरवण्याची गरज आहे. त्यांना हरवण्याची ज्यांची क्षमता आहे, त्या महाविकास आघाडीलाच मतदान करा, असं आवाहन तुषार गांधी यांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला मतदान करू नका असाही याचा अर्थ आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
'एक राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीला माझा विरोध नाही. प्रकाश आंबेडकरांशी मैत्रीभाव आहेच, पण आताची वेळ वेगळी आहे. वंचितनं आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी होती. किमान यावेळी त्यांनी स्वत:चा फायदा बाजूला ठेवून देशाचं हित पाहायला हवं होतं. ते त्यांनी केलं नाही म्हणून ते टीकेला पात्र ठरतात, असं तुषार गांधी म्हणाले.
'जे चूक आहे ते चूकच आहे आणि चूक स्पष्टपणे सांगायची हीच वेळ आहे. यावेळी जर आपण स्पष्ट मत दिलं नाही तर पूर्वी झालेली चूक पुन्हा होणार. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचवायचं असेल तर ही शेवटची संधी आहे, असंही तुषार गांधी यांनी स्पष्ट केलं.
वंचित बहुजन आघाडीनं स्वबळावर लढावं यासाठी भाजपचा दबाव असावा का, या प्रश्नाचंही उत्तर तुषार गांधी यांनी दिलं. ‘वंचित स्वतंत्र लढत असल्यामुळं भाजपलाच फायदा होणार आहे. वंचित किंवा एमआयएम ज्या लोकांची मतं घेतात, ते मतदार काँग्रेस आणि पुरोगामी जे पक्ष आहेत. त्यांचं नुकसान होणार आहे. त्यामुळं या सगळ्यात भाजपचा हात आहे असंच म्हणणं चुकीचं नाही,’ असंही तुषार गांधी म्हणाले.
तुषार गांधी यांच्या या भूमिकेबद्दल प्रकाश आंबेडकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुमचं वंचितबद्दलचं विधान संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वाचा संघर्ष नाकारणारं आहे. महाविकास आघाडीनं वंचितला कशी वागणूक दिली हे तुम्हाला माहीत नाही. मविआचा भाजपशी काय समझोता झाला आहे त्याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्हाला राजकीय ज्ञान नसेल तर मूर्खपणाची व बाष्कळ बडबड बंद करा. काळ सत्य काय ते सांगेल,' असं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
संबंधित बातम्या