सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha election) महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर केला असला तरी या मतदारसंघातील तिढा पूर्णपणे सुटल्याचे दिसत नाही.सांगली मतदारसंघाचा (Sangli Lok Sabha Constituency) पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मविआकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांची व स्थानिक नेत्याची नाराजी दूर करण्यात अद्याप महाविकास आघाडीतील नेत्यांना यश आलेले नाही.
दिल्लीपर्यंत प्रयत्न करूनही विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असून येथे काँग्रेसच्याच तिकिटावर उमेदवार जाहीर करायला हवा, अशी मागणी करत काँग्रेस नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मिरज तालुका काँग्रेस समिती बरखास्त केल्यानंतर सांगलीतील काँग्रेस भवन इमारतीवरील काँग्रेस शब्दावर पांढरा रंग लावून हा शब्द पुसून टाकला आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष सुभाष खोत म्हणाले की, सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही. लोकसभा निवडणुकीसाठी विशाल पाटील यांचा एकच अर्ज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीकडून हायकमांडकडे पाठवला होता. मात्र जागावाटपात ही जागा काँग्रेसकडून निसटली. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने सांगलीची जागा ठाकरे गटाला दिली. शिवसेनेला जागा देताना याचा विचार केला नाही की, स्थानिक पातळीवर त्यांचा एक नगरसेवक नाही, ग्रामपंचायतीमध्ये सदस्य नाही, यापूर्वीलोकसभेची निवडणूक लढवलेली नाही.
दुसरीकडे दोन वेळचा अपवाद वगळता काँग्रेसने ही जागा तब्बल १७ वेळा जिंकली आहे. जिल्ह्यातील बहुतांश संस्था काँग्रेसच्या ताब्यात आहे. तरीही ही जागा शिवसेनेकडे गेल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्याचबरोबर विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून सांगलीतून लोकसभेची निवडणूक लढण्याचा आग्रह कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे विशाल पाटील काय भूमिका घेणार पाहणे महत्वाचे आहे.
काँग्रेस नेते विशाल पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी विश्वजीत कदम (vishwajeet kadam) यांनी दिल्लीपर्यंत मजल मारली होती. जिल्हा काँग्रेस व महाराष्ट्र काँग्रेसकडून अनेक प्रयत्न करूनही सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे आला नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले होते व सोशल मीडियावर ‘आमचं काय चुकलं’ असे मेसेज व्हायरल होते होते. त्यानंतर आता कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.
सांगलीतील जिल्हा कार्यालय काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला रंग लावून हा शब्द पुसून टाकला आहे. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर फलक होता. संतप्त कार्यकर्त्यांनी यातील काँग्रेस शब्दच पुसून टाकला आहे.