महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा घोळ असून सुरू असून काही जागांचा वाद दिल्ली दरबारी पोहोचला आहे. त्यामध्ये सांगली मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना न कळवता परस्पर सांगली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला. उद्धव ठाकरे यांनी मिरजेतील जनसंवाद यात्रेतील जाहीर सभेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करत काँग्रेसवर कुरघोडी केली होती. काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने काँग्रेस या मतदारसंघासाठी आग्रही आहे.
सांगली मतदारसंघात उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली होती. सांगलीतील उमेदवारीचा वाद शमलेला नसताना आता ठाकरे गटाने आणखी एका मतदारसंघात कुरघोडी करायला सुरूवात केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला असतानाही ठाकरे गटाकडून मेळावे घेतले जात आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून बलवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र याच मतदारसंघातून ठाकरे गटाकडून बंडखोरी होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांच्याकडून अनेक ठिकाणे मेळावे घेतले जात आहेत. ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब अमरावतीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. अमरावतीमधून काँग्रेसने उमेदवार देऊनही ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान अमरावती मतदारसंघावरून महायुतीतही घमासान सुरू आहे. हा मतदारसंघ भाजपला गेल्याने आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त करत वेळ पडल्यास महायुतीतून वेगळं होण्याचा इशारा दिला आहे. भाजपकडून या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा यांना संधी मिळू शकते. २०१९ च्या निवडणुकीत च्यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर पराभव केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी लोकसभेत नेहमी पीएम मोदींच्या समर्थनार्थ भूमिका घेत भाजपसाठी आक्रमक भूमिका मांडली. अमरावतीमधून नवनीत राणा व बलवंत वानखेडे यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे आहेत.