लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्षात जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच एकेक मतदारसंघ घटक पक्षांना जाताच बंडखोरी होण्याचे संकेतही मिळत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच आता अमरावती मतदारसंघातही (Amravati Lok sabha constituency) महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघ भाजपकडे गेला असून रामटेकची जागा शिवसेना शिंदे गट लढवणार आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, प्रत्येक मतदारसंघात मतभेद असतात. अमरावती मतदारसंघातही मतभेद आहेत.बच्चू कडू किंवाअडसूळ यांचे मतभेद झाले असतील. मात्र देशात नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बच्चू कडू व अडसूळ सर्व मतभेद विसरून प्रयत्न करतील. हे नेते आमच्यासोबत राहतील असा विश्वासही भाजपा प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला विश्वासात न घेता मतदारसंघ जाहीर केले जात असतील तर अशा परिस्थितीत आमचा अजिबात पाठिंबा राहणार नाही. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, पाठिंबा देण्याची मानसिकताच राहिली नाही. वेळ आली तर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही अडचणीत येत असल्याचं वाटायला लागलं. वेळ आली तर आम्ही अमरावतीत उमेदवार देवूच. अमरावती लोकसभा मतदारसंघात आमचे दोन आमदार सोडून किमान एक लाख मते आहेत. अमरावती मतदारसंघावर शिवसेनेनेच करायला हवा होता. मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय हे थोडं अंगलट येताना दिसतंय.
महायुतीत तोडायची सुरुवात त्यांच्याकडून झाली असेल तर आम्हीही मागे राहणार नाही. आम्हाला युतीतून बाहेर जायचं नाही, मात्र तुम्हाला युती ठेवायचीच नाही तर आम्ही काही गुलाम नाही.
दरम्यान बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याविरोधात भाजप नेते विजय शिवतारे यांनी मोर्चा खोलला आहे. मला पक्षातून काढले तरी मी बारामतीतून लढणार असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर भाजपच्या चिन्हावरही निवडणूक लढण्याची त्यांची तयारी आहे. यामुळे महायुतीत वादाच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत.
संबंधित बातम्या