मराठी बातम्या  /  निवडणुका  /  kalyan lok sabha : कल्याणच्या सुभेदारीसाठी तुंबळ संघर्ष होणार! ठाकरेंकडून केदार दिघे मैदानात उतरणार?

kalyan lok sabha : कल्याणच्या सुभेदारीसाठी तुंबळ संघर्ष होणार! ठाकरेंकडून केदार दिघे मैदानात उतरणार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 23, 2024 05:30 PM IST

Kedar dighe may contest from kalyan lok sabha : ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

कल्याणच्या सुभेदारीसाठी तुंबळ संघर्ष होणार! ठाकरेंकडून केदार दिघे मैदानात उतरणार?
कल्याणच्या सुभेदारीसाठी तुंबळ संघर्ष होणार! ठाकरेंकडून केदार दिघे मैदानात उतरणार?

Kalyan Lok sabha Election 2024 : शिवसेनेत फूट पाडून भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे मोठा डाव टाकण्याच्या विचारात आहेत. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. तसं झाल्यास ही लढत राज्यातील सर्वाधिक चर्चेची ठरणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळं एकाच पक्षात असलेले लोक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. प्रतिस्पर्ध्याला मात देण्यासाठी तुल्यबळ मोहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे सध्या खासदार आहेत. त्यांच्या विरोधात केदार दिघे यांना उतरवलं जाण्याची शक्यता आहे.

केदार दिघे हे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. ते धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. दिवंगत आनंद दिघे हे बाळासाहेबांचे विश्वासू शिलेदार होते. ठाणे शहर व जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आता आमदार, खासदार असलेले अनेक जण आनंद दिघे यांच्याच तालमीत तयार झाले आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांना गुरूस्थानी मानतात.

शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतही केदार दिघे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. आनंद दिघे हे अखेरपर्यंत शिवसेनेशी निष्ठावंत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचं केदार यांचं म्हणणं आहे. निवडणूक प्रचारात केदार दिघे हे हा मुद्दा पुन्हा अधोरेखित करू शकतात. त्यांना कल्याण लोकसभेच्या रिंगणात उतरवल्यास मोठी सहानुभूती मिळण्याचीही शक्यता आहे.

भाजपची भूमिका निर्णायक ठरणार

कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये फारसं आलबेल नाही. आमदार गणपत गायकवाड आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय वैर आहे. हा मतदारसंघ भाजपनं लढवावा, असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. मात्र, तो शिंदे गटाकडं गेल्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे. शिवसेनेच्या बाहेरही आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशात जर केदार दिघे यांचा पर्याय मिळाल्यास कल्याणमधील चित्र पालटू शकतं, असं बोललं जातं.

अजित पवार गटाचीही नाराजी

बारामतीमध्ये शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकल्यानं अजित पवार गटही नाराज आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना आवर न घातल्यास त्याचा परिणाम कल्याण लोकसभा मतदारसंघात होऊ शकतो, असा इशाराच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दिला आहे.

WhatsApp channel