satara lok sabha : साताऱ्यात महायुतीचं कसं होणार? उदयनराजे दिल्लीत असताना नरेंद्र पाटलांनी दंड थोपटले!-satara lok sabha election 2024 narendra patil makes claims while udayanraje trying for the seat ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  satara lok sabha : साताऱ्यात महायुतीचं कसं होणार? उदयनराजे दिल्लीत असताना नरेंद्र पाटलांनी दंड थोपटले!

satara lok sabha : साताऱ्यात महायुतीचं कसं होणार? उदयनराजे दिल्लीत असताना नरेंद्र पाटलांनी दंड थोपटले!

Mar 23, 2024 04:20 PM IST

Narendra Patil for Satara Lok Sabha Seat : उदयनराजे यांच्या ठाम भूमिकेमुळं सातारा लोकसभा जागेचा तिढा वाढला असतानाच आता नरेंद्र पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

साताऱ्यात महायुतीचं कसं होणार? उदयनराजे दिल्लीत असताना नरेंद्र पाटलांनी दंड थोपटले!
साताऱ्यात महायुतीचं कसं होणार? उदयनराजे दिल्लीत असताना नरेंद्र पाटलांनी दंड थोपटले!

Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आठवडा उलटल्यानंतरही महायुती व महाआघाडीतील उमेदवारीचा घोळ कायम आहे. साताऱ्याच्या जागेवरून महायुतीमध्ये मतभेद असताना आता भाजपमधूनच इच्छुकांची संख्या वाढली आहे. भाजपचे नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनीही या जागेसाठी दावा केला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) इच्छुक आहेत. ते सध्या भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी साताऱ्याच्या जागेवर दावा केला आहे. भाजप-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडं होता. त्यामुळं शिंदे गट या जागेची आशा ठेवून आहे.

मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला असल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या जागेवर दावा केला आहे. इथं सध्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. तर, २०१९ मध्ये पराभूत झालेले उदयनराजे यांना इथून पुन्हा लढून पराभवाचा वचपा काढायचा आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ते भाजप नेत्यांशी चर्चा करत आहेत. राज्यात त्यांच्या मागणीवर तोडगा न निघाल्यानं ते दिल्लीला गेले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ते दिल्लीत तळ ठोकून आहेत.

जिल्ह्यात माझा उत्तम जनसंपर्क

उदयनराजे दिल्लीत असताना इकडं माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे. सातारा शहर व गावांमध्ये माझा उत्तम संपर्क आहे. पक्ष मला न्याय येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

नरेंद्र पाटील यांनी २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर सातारा लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यावेळी उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. उदयनराजे यांनी त्या निवडणुकीत नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. आता पुन्हा ते पक्षाकडून तिकिटाची अपेक्षा ठेवून आहेत.

उदयनराजेंनी सबुरीनं घ्यावं!

उदयनराजे हे तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्यांना अमित शहा यांची भेट मिळत नाही हे ऐकून वाईट वाटतं. आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो. शिवाय ते राज्यसभेचे खासदार आहेत. तरी देखील त्यांना भेट मिळत नाही, याबद्दल नरेंद्र पाटील यांनी दु:ख व्यक्त केलं. उदयनराजे यांनी सबुरीनं घ्यायला हवं. पक्षाचा निर्णय अंतिम असतो. पक्ष कोणाच्या पारड्यात वजन टाकेल सांगणं अवघड आहे, असं सूचक वक्तव्यही पाटील यांनी केलं.