महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा असून पुरता सुटलेला नाही. त्यातच वंचितही महाआघाडीत सामील होणार की नाही, याची शाश्वती नसताना कोल्हापुरातून महाआघाडीला दिलासादायक वृत्त आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना वंचितचा पाठिंबा जाहीर केला आहे. प्रकार आंबेडकरांची कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमची नेहमी आदर्श भूमिका असते. शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कुटुंब चळवळीतील कुटुंब आम्ही मानतो. यामुळे वंचित आघाडीचा शाहू महाराजांना संपूर्ण पाठिंबा राहील. आमचे कार्यकर्ते छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्यासाठी सर्व प्रयत्न करतील. पक्ष म्हणून आम्ही शाहू महाराजांच्या मागे ठामपणे उभे राहू. त्याचपद्धतीने मागच्या निवडणुकीत जे घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची दक्षता घेतली जाईल.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की,ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्ष काढला आहे. त्यांनी त्यांची उमेदवार यादी वंचितकडे सोपवली आहे. मात्र आमचं महाविकास आघाडीत भिजत घोगडं ठेवलंय. त्यामुळे शेंडगे यांच्याशी यावर चर्चा झालेली नाही. महाआघाडीतील घोळ मिटल्याशिवाय आम्ही पुढील निर्णय घेऊ शकत नाही. महाआघाडीतील समावेशाबाबत विचारल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या युतीबाबतची चर्चा त्यांनाच विचारा.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर शाहू महाराज म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मला पाठिंबा व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. हाच दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी मला आज पाठिंबा दिला असेल, असं शाहू महाराज म्हणाले.
संबंधित बातम्या