मराठी बातम्या  /  निवडणुका  /  vadodara news : मोदींच्या घरच्या मतदारसंघातच भाजपला झटका; दोनदा निवडून आलेल्या उमेदवाराची माघार

vadodara news : मोदींच्या घरच्या मतदारसंघातच भाजपला झटका; दोनदा निवडून आलेल्या उमेदवाराची माघार

Mar 23, 2024 12:52 PM IST

Vododara lok sabha election : गुजरातमधील वडोदरा लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रंजन भट्ट यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली आहे.

मोदींच्या घरच्या मतदारसंघात भाजपला झटका; दोनदा निवडून आलेल्या उमेदवाराची माघार
मोदींच्या घरच्या मतदारसंघात भाजपला झटका; दोनदा निवडून आलेल्या उमेदवाराची माघार

Ranjan Bhatt : 'अब की बार ४०० पार' म्हणत देशभरात निवडणुकीची मोर्चेबांधणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरच्या मतदारसंघात मोठा झटका बसला आहे. वडोदरा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रंजनबेन भट्ट यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

रंजनबेन भट्ट या वडोदरा मतदारसंघाच्या (Vadodara Lok Sabha) विद्यमान खासदार आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जागेवरून दणदणीत विजय मिळवला होता. वाराणसी मतदारसंघासाठी मोदी यांनी हा मतदारसंघ सोडला होता. त्यानंतर झालेल्या वडोदराच्या पोटनिवडणुकीत भाजपनं रंजनबेन यांना संधी दिली. त्याही या जागेवरून विजयी झाल्या. त्यानंतर २०१९ मध्ये रंजनबेन यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आणि त्या विक्रमी फरकानं विजयी झाल्या. यावेळी तिसऱ्यांदा त्यांना संधी देण्यात आली होती.

ट्रेंडिंग न्यूज

माघार घेण्याचं कारण काय?

रंजनबेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली आहे. वैयक्तिक कारणांमुळं मी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रंजनबेन यांच्या उमेदवारीवरून काही दिवसांपूर्वी पोस्टर वॉर सुरू झालं होतं. यातील काही पोस्टर्समध्ये ‘मोदी तुमसे बैर नाही, रंजन तुम्हारी खैर नही…’ असा प्रचार इथं सुरू करण्यात आला होता. काहींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्यावरही टीकेची झोड उठवली होती. भाजपचे या मतदारसंघातील आमदार केतन इनामदार यांनी राजीनामाही दिला होता. मात्र त्यांनी तो परत घेतला. या सगळ्या पार्श्वभूमीवर रंजन भट्ट यांनी माघार घेतली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील तीव्र नाराजीची दखल घेऊन पक्षानंच रंजन भट्ट यांना माघार घेण्यास सांगितलं आहे. आता या मतदारसंघातून भाजप कोणाला उमेदवारी देणार याविषयी उत्सुकता आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं गुजरातमध्ये सर्व २६ जागांवर विजय मिळवला होता. यावेळच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत भाजपनं २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात रंजनबेन यांच्यासह चार महिलांच्या नावांचा समावेश होता. रंजनबेन यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर आता केवळ ३ महिला उमेदवार उरल्या आहेत.

काँग्रेसमध्येही नाराजीचे सूर

भाजपबरोबरच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्येही नाराजीचे फटाके फुटत आहेत. काँग्रेसनं आतापर्यंत ७ जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे. त्यापैकी अहमदाबाद पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रोहन गुप्ता यांनी माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांवर आरोपही केले आहेत. आम आदमी पक्षानं काँग्रेसशी हातमिळवणी केली असून हा पक्ष दोन मतदारसंघातून उमेदवार उभे करणार आहे.

WhatsApp channel